जात प्रमाणपत्रासाठी कुमारी मातेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 05:03 AM2018-03-02T05:03:13+5:302018-03-02T05:03:13+5:30

ती एक कुमारी माता. प्रेमाच्या आणाभाका घेत पदरात एक मूल टाकून प्रियकराने पळ काढला. समाजाचा प्रचंड तिटकारा, उपेक्षा सहन करीत तशाही परिस्थितीत तिने त्या मुलाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.

Woman's Wander for Caste Certificate | जात प्रमाणपत्रासाठी कुमारी मातेची भटकंती

जात प्रमाणपत्रासाठी कुमारी मातेची भटकंती

googlenewsNext

वरोरा (चंद्रपूर) : ती एक कुमारी माता. प्रेमाच्या आणाभाका घेत पदरात एक मूल टाकून प्रियकराने पळ काढला. समाजाचा प्रचंड तिटकारा, उपेक्षा सहन करीत तशाही परिस्थितीत तिने त्या मुलाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. त्याला आपले नाव दिले. शाळेत घातले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र आता या महाविद्यालयाला जात पडताळणीचे प्रमाणपत्र हवे असल्याने ती या प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे.
तालुक्यातील वाघनख या गावातील एका कुमारी मातेचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मात्र त्याच्या शिक्षणात जात पडताळणी प्रमाणपत्र अडसर ठरत आहे. हे प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याला मागील वर्षीच्या परीक्षेचा निकालही अद्याप दिला नाही. जोपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र आणणार नाही, तोपर्यंत परीक्षेला बसू देणार नाही, असे म्हणून महाविद्यालयाने त्याला तीन तास वर्गाबाहेर उभे ठेवले. आता जात पडताळणीच्या दाखल्यासाठी त्याची आई वणवण फिरते आहे.
‘बिन बापाचं लेकरू’ असे म्हणून सर्वच हिणवत असतांना आपल्या पोटच्या गोळ्याला आपले नाव देऊन तिने त्याला नवीन ओळख दिली. परिस्थीची हलाखीची असतानाही पोटाला चिमटा काढत तिने मुलाला इंजिनियरिंगला टाकले. पण शासनाच्या जाचक अटींमुळे तिच्या मुलाचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यांचा जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर येथील समाज कल्याण कार्यालयात धूळखात पडून आहे. मुलाला आईने आपले नाव तर दिले. मात्र समाज कल्याण विभाग त्याला वडिलांचा पुरावा मागत आहे.
>जात ही वडिलांकडून येत असते. आईकडून नाही. कुमारी मातेसंदर्भात कुठलाही अध्यादेश किंवा शासन निर्णय नसल्यामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे. सुधारित अध्यादेश किंवा शासन निर्णय आल्यास त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल.
-प्रसाद कुलकर्णी, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग, चंद्रपूर.

Web Title: Woman's Wander for Caste Certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.