महिलांनी मागितली दारू विक्रीची परवानगी
By admin | Published: June 4, 2016 12:41 AM2016-06-04T00:41:56+5:302016-06-04T00:41:56+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असताना तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे.
मोर्चाद्वारे निवेदन : गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री
तळोधी (बा.): चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असताना तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे. दारू विक्रेत्यांंना पोलिसांचे अभय मिळत असल्यामुळे दारूविक्रीला कंटाळून तळोधी (बा.) येथील महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देवून चक्क दारूविक्री करण्याची परवानगीच मागितली. महिलांच्या या अभिनव आंदोलनाने पोलिसांचीही चांगलीच गोची झाली आहे.
तळोधी (बा.) येथे दिवसाढवळ्या पवनी (आसगाव) कान्पा मार्गे तळोधी (बा.) येथे दारू महागड्या वाहनांमधून उतरविल्या जाते. मात्र पोलिसांचे दारू विक्रेत्यांसोबत असलेल्या ‘मधूर’ संबंधामुळे दारूविक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा महिलांचा आरोप आहे. त्यामुळे खुलेआमपणे पानठेल्यातून दारू विक्री केल्या जाते. अनेकवेळा पोलिसांना माहिती देवूनसुद्धा पोलीस वेळेवर पोहचत नाहीत. प्रत्येक वॉर्डात दारूविक्री सुरू असताना पोलीस जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी आमचे कुणी काही करु शकत नाही, अशा अविर्भावात दारू विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत.
त्यामुळे तळोधी (बा.) येथील अनेक महिलांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रा.उपेंद्र चिटमलवार व दारूबंदी समितीचे अध्यक्ष सरपंच राजू रामटेके यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडली. त्यानंतर गुरूवारी सकाळी येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दारू विक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा आम्हाला दारू परवानगी द्या, अशी मागणी महिलांनी निवेदनद्वारे ठाणेदार विवेक सोनवने यांच्याकडे केली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रा. उपेंद्र चिटमलवार सरपंच राजू रामटेके, ग्रा.पं. सदस्य विलास लांजेवार, शालू ताटकर, नलीनी वसाके व अन्य महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)