दारुबंदीकरिता महिलांनी पुकारला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:00 PM2019-03-01T23:00:49+5:302019-03-01T23:01:26+5:30
जिल्ह्यात दारूबंदी परंतु, बह्मपुरी तालुक्यातील चिंचोली, हरदोली, पेपर मिल चौक, चिखलगाव व अन्य गावांमध्ये सर्रास दारूविक्री सुरू असल्याने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असतानाच चिंचोली येथील महिलांनी स्वयंस्फूर्तीने दारूविक्रेत्यांविरूद्ध एल्गार पुकारला आहे. २७ फेब्रुवारीला गावातील विठ्ठल मंदिर परिसरात पार पडलेल्या सभेत आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, पोलीस प्रशासनही महिलांना पाठबळ देण्यास पुढे सरसावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : जिल्ह्यात दारूबंदी परंतु, बह्मपुरी तालुक्यातील चिंचोली, हरदोली, पेपर मिल चौक, चिखलगाव व अन्य गावांमध्ये सर्रास दारूविक्री सुरू असल्याने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असतानाच चिंचोली येथील महिलांनी स्वयंस्फूर्तीने दारूविक्रेत्यांविरूद्ध एल्गार पुकारला आहे. २७ फेब्रुवारीला गावातील विठ्ठल मंदिर परिसरात पार पडलेल्या सभेत आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, पोलीस प्रशासनही महिलांना पाठबळ देण्यास पुढे सरसावले आहे.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना दारूविके्रते गब्बर होत आहेत. दारूसोबतच अवैध धंद्यानाही उधाण आले. त्यामुळे या व्यवसायांच्या समूळ उच्चाटनासाठी चिंचोली येथील महिलांनी कंबर कसली. जोमाने सुरू असलेली दारूविक्री व जुगाराविरूद्ध आवाज उठविणे सुरू केले. पोलिसांनी दारूविके्रत्यांच्या घरावर धाडी घालून तत्काळ बंद करण्याची मागणी सभेत केली. चिंचोली हे गाव ब्रह्मपुरीपासून आठ किमी तर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरापासून चार किमी अंतरावर आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा होत आहे. तालुक्यातील हरदोली (पेपरमिल चौक), चिंचोली, चिखलगाव, सावलगाव, सोनेगाव, सोंद्री, बेटाळा व वैनगंगा नदीच्या पुलालगत पोलिस चौकी उभारण्यात आली असती तर दारुवाहतुकीला आळा बसला असता. परंतु याठिकाणी अशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून वडसा मार्गे ब्रम्हपुरी तालुक्यात रात्रंदिवस दारूचा पुरवठा होतो. वडसा शहराला लागून व वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये दारू पुरविली जाते. त्यामुळेच दारूबंदीसाठी चिंचोली येथील रणरागिणी पुढे सरसावल्या आहेत महिलांनी एकत्रित आल्या. परिसरातील दारूविक्रेत्यांच्या घरावर धाडी घालून दारूबंदी करण्याची सभेत उपस्थित असलेल्या पोलिसांकडे केली.
एक आठवड्यात दारूविक्री बंद झाली नाही तर आमच्या पध्दतीने दारूबंदी करण्याचा इशाराही दिला आहे. ब्रम्हपुरीचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांनी महिलांनी सुरू केलेल्या मोहिमेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महिलांच्या सहकार्याशिवाय दारूबंदीहोऊ शकत नाही. चिंचोली येथील महिलांप्रमाणेच परिसरातील अन्य गावांनीही सभा घेऊन दारूविक्रेत्यांविरूद्ध आवाज उठावावा.
माजी आमदार उद्धव शिंगाडे म्हणाले, तालुक्यातील गावा-गावातील महिलांनी अशाच पद्धतीने संघटित होऊन दारूबंदी मोहीम सुरू करावी. दारूबंदीसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. दारूमुक्तीनेच गावाच्या विकासाला चालना मिळू शकते. युवापिढी शेती अथवा उच्च शिक्षण घेऊन प्रगती करू शकते, असेही शिंगाडे यांनी सांगितले.
महिलांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. पंचायत समितीच्या सदस्य सुनंदा ढोरे, सरपंच दर्शना दिवटे, उपसरपंच तुकाराम ढोरे, माजी पोलीस पाटील रघुनाथ पारधी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गजानन ढोरे, रामलाल ढोरे, आनंदराव पत्रे व ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. ग्रामसेवक रतिराम चौधरी, प्रास्ताविक माजी पोलिस पाटील रघुनाथ पारधी यांनी केले. उपसरपंच तुकाराम ढोरे यांनी आभार मानले.
पोलीस प्रशासनातील जादा कर्मचाऱ्यांची गरज
ब्रह्मपुरी तालुक्यातील ११४ गावे आहेत. परंतु, सद्यस्थितीत केवळ ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कायदा व सुव्यवस्थेचे काम सांभाळल्या जात आहे. शेतीच्या आधारावरच उदरनिर्वाह करणाऱ्या तालुक्यातील गावांची संख्या पाहता दारू विक्रेत्यांनी आपले हातपाय कसे पसरविले, हा प्रश्न निर्माण होतो. दारूमुळे युवापिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, असा आरोप पंचायत समितीच्या सदस्य सुनंदा ढोरे यांनी केला. सरपंच दर्शना दिवटे यांनीही कौटुंबिक समस्यांकडे लक्ष वेधले. अपुरे कर्मचारी व दारू विके्रत्यांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यात दारुबंदीला आळा बसला नाही. विके्रते घरपोच दारू पोहोचवितात. त्यामुळे दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी महिलांनी ग्रामसभेत केली. यावेळी बहुसंख्य महिला बचत गटाच्या सदस्य, युुवती, ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.