महिला दिनीच महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By Admin | Published: March 10, 2017 01:46 AM2017-03-10T01:46:36+5:302017-03-10T01:46:36+5:30
पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात स्थान द्यावे, या हेतूने जागतिक स्तरावर ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो.
आष्टी (काकडे) येथील घटना
भद्रावती : पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात स्थान द्यावे, या हेतूने जागतिक स्तरावर ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. परंतु याच दिवशी तालुक्यात एका महिलेने आत्महत्या केली. या प्रकारामुळे आजही स्त्री ही अन्यायग्रस्त आहे, हेच सिद्ध होते.
इंदू काशिनाथ बोढे या ५० वर्षीय महिलेने बुधवारी गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील आष्टी (काकडे) या गावात ही दुर्दैवी घटना घडली. या महिलेला चार मुली असून सर्वांचे विवाह पार पडले आहे. पती आणि पत्नी असे दोघेच मोलमजुरी करुन गावात राहात होते. त्यांचा सुखी संसार सुरु असताना अचानक काय आक्रित घडले, हे कळलेच नाही. त्यांच्यात कोणता वाद होता, हेदखील पुढे आले नाही.
ज्या दिवशी संपूर्ण जगभर महिलांचा सन्मान होत होता. त्याच दिवशी इंदू बोढे यांचे प्रेत विहिरीत आढळले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास ठाणेदार विलास निकम यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे करीत आहे. (शहर प्रतिनिधी)