ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार हिरावतोय ! उद्योग सुरु करण्याची महिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:25 IST2025-04-14T15:24:40+5:302025-04-14T15:25:29+5:30
जंगलावर आधारित नवीन उद्योग सुरू करा : वन निवासी भागातील महिलांची मागणी

Women in rural areas are being deprived of employment! Women demand to start businesses
विकास खोब्रागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव (पि.) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वन विभागाचा विस्तार व वन कायदा ग्रामीण भागातील मुख्य व पारंपरिक रोजगार निर्मितीत मुख्य अडसर ठरत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जंगलव्याप्त ग्रामीण भागातील महिला बचत गट व युवकांकडून केली जात आहे.
चिमूर तालुक्यामधील बहुतांश गावे ही जंगलालगत आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील बराचसा भाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलावर आधारित मोहफुले, तेंदुपता गोळा करण्यात येतात. ग्रामीण भागातील जंगलाशेजारी राहणारी जनता आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून होती. दिवसेंदिवस जंगल राखीव वनक्षेत्र तयार झाल्याने काही कामांना बंदी घालण्यात आली. कुन्हाड बंदी, गुरे चराई, स्वयंपाकासाठी सरपण गोळा करणे आदी कामांवर बंधने आली. जंगलावरील ताण कमी करण्यासाठी व मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावातच रोजगार निर्मिती व्हावी म्हणून बफर झोन क्षेत्रातील गावात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जनधन विकास योजनेच्या माध्यमातून गावागावात संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापना करण्यात आल्या. समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस जोडणी, बेरोजगार तरुणांना रोजगार प्रशिक्षण, गावातील तरुण महिला बचत गटाच्या महिलांना माहिती व सूक्ष्म नियोजन करण्यात आले. मात्र, यातून रोजगार निर्मिती होत नसल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे.
वन विभागामार्फत मोफत रोजगार दिल्याचा कांगावा करण्यात येतो. मात्र, काही जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील तरुण मुले, महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हिरावला जात आहे. वन विभागाकडून काही प्रमाणात महिलांना रोजगार दिला होता. मात्र, वन विभागाच्या अधिकारी वर्गाकडून लादलेल्या जाचक अटींमुळे काही गरीब आदिवासी महिलांचा रोजगारच हिरावला जात असल्याचे चित्र चिमूर तालुक्यात सध्या दिसत आहे.
वन विभाग रोजगार पुरविण्यात अपयशी
पिढ्यांपिढ्या कसत असलेली अतिक्रमणित शेतीचे स्थायी पट्टे न देता वन विभागाने ते भुईसपाट केली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असून, भूमिहीन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे तरुण बेरोजगार झाला आहे. बेरोजगारीच्या तुलनेत रोजगार पुरविण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
रोजगार दिल्याचा कांगावाच
वन विभागामार्फत मोफत रोजगार दिल्याचा कांगावा करण्यात येतो. मात्र, काही जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील तरुण मुले, महिला अजूनही रोजगारापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हिरावला जात आहे.
मोजक्याच तरुणांना पर्यटनातून रोजगार
ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या गावात पर्यटन क्षेत्रामधून जंगल सफारी करण्यात येत आहे. यात १६ गाइड व जिप्सी चालकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. मात्र, अजूनही गावातील सुशिक्षित तरुणाई बेरोजगारच आहे.