वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
By Admin | Published: September 25, 2016 01:11 AM2016-09-25T01:11:01+5:302016-09-25T01:11:01+5:30
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या रेखा हरीदास गुरनुले (४०) रा. सायगाव यांच्यावर वाघाने हल्ला चढवून
तत्काळ मदत : सायगाव येथील घटना
ब्रह्मपुरी : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या रेखा हरीदास गुरनुले (४०) रा. सायगाव यांच्यावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल शुक्रवारला सायंकाळी घडली आहे.
ब्रह्मपुरी वनविभागात काल रेखा हरिदास गुरनुले रा. सायगाव शेतीकाम करण्यासाठी गेल्या होत्या. परंतु बराचसा वेळ होऊनही त्या घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली व याबाबतची माहिती दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहायक, आवळगाव व उत्तर ब्रह्मपुरी क्षेत्र सहाय्यक दिली. माहिती प्राप्त होताच दोन्ही क्षेत्रसहायक व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्रातील मुरपार नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २०७ मध्ये शोध घेतला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर सहायक वनसंरक्षक (जमीन व कॅम्प), दक्षिण ब्रह्मपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हे वनकर्मचाऱ्यासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. रात्री उशिरा मृत महिलेचे शव ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गिता नन्नावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) आशा चव्हाण, जि.प.सदस्या मडावी व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वतीने मृताच्या कुटुंबांना २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात आली. ज्या भागात हा प्रकार घडला, त्या ठिकाणाची पाहणी केली असता वाघाचे पगमार्क आढळून आले. त्यामुळे वनविभाग या वाघावर नजर ठेवून आहे. असे असले तरी नवेगाव, सायगाव परिसरात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने गावकरी भयभीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)