समस्यांचा डोंगर, सुविधा नसताना करवाढ; रणरागिणींची मनपावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:24 PM2022-03-09T17:24:28+5:302022-03-09T17:27:23+5:30
पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हैराण झालेल्या या रणरागिणींनी अधिकाऱ्यांना चांगलेच पैलावर घेतले.
चंद्रपूर : बाबूपेठसह शहरातील विविध प्रभागांत समस्यांचा डोंगर वाढतच असल्याचा आरोप करून महिलांनी बुधवारी मनपाला धडक दिली. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हैराण झालेल्या या रणरागिणींनी अधिकाऱ्यांना चांगलेच पैलावर घेतले.
प्रभागात सुविधा नसताना भरमसाठ वाढवलेले मालमत्ता कर, पाण्याची समस्या, मागासवर्गीयांचे वास्तव्य असलेल्या बाबूपेठ येथील हेतुपुरस्पर संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम, रस्ते नाल्याचे इंदिरानगर बाबूपेठ, श्याम नगर, वडगाव, नगिनाबाग, तुकुम व अष्टभुजा येथील प्रलंबित कामांकडे महिलांनी लक्ष वेधले.
घंटागाडी महिलांना १० वर्षे जुनी निकृष्ट गाडीऐवजी नवीन अत्याधुनिक घंटागाडी पुरवावी, रमाई आवास प्रकरणांचा निपटारा करावा, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात महिलांनी आंदोलन केले. दरम्यान, निवेदन देताना उपायुक्त अशोक गराटे शिष्टमंडळासोबत उद्धटपणे वागल्याने त्यांच्या दालनातच निषेध नोंदविण्यात आला.