पाण्यासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:10 AM2019-06-24T00:10:35+5:302019-06-24T00:13:18+5:30
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केवाडा पेठ गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पंचायत समितीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे गावातील संतापलेल्या महिला एकत्रित येऊन पंचायत समितीवर धडकल्या व पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, या गावातील महिलांनी गावातील समस्या जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्यापुढे मांडल्या असता बुटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली. मासळ-मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रात केवाडा गाव येत असून येथील गोड पाण्याची विहीर आटली आहे. गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पैसे भरले. मात्र पंचायत समितीने प्रशासनाने याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अखेर गावातील संतापलेल्या महिला एकत्रित आल्या. जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारून उपाययोजनेची मागणी केली.