दारूबंदीसाठी महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या
By admin | Published: April 11, 2017 12:52 AM2017-04-11T00:52:29+5:302017-04-11T00:52:29+5:30
शासनाने दारुबंदी केली असली तरी ती फसवी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक गावात दारुचा महापूर आहे ...
नागभीड : शासनाने दारुबंदी केली असली तरी ती फसवी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात प्रत्येक गावात दारुचा महापूर आहे आणि याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या बोथली येथील महिलांनी सोमवारी नागभीड पोलीस ठाण्याला धडक दिली आणि गावात दारुबंदीची मागणी केली.
बोथली हे नागभीड नगरपरिषदेअंतर्गत गाव असून गावाची लोकसंख्या सातशे ते आठशे आहे.असे असले तरी या गावात किमान पाच-सहा व्यक्ती दारुची अवैध विक्री करीत आहेत. गावात मुबलक प्रमाणात दारु मिळत असल्याने पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरातील कर्तेपुरुष दिवसभराची. मजुरी दारुतच खर्च करीत असल्याने महिलांना याचा मोठा त्रास होत आहे. एवढेच नाही तर भविष्यात लहान मुलेही दारुच्या आहारी जातील, अशी भीती या महिलांना वाटत आहे.
गावातील वातावरण खराब होण्यास दारु हेच प्रमुख कारण असून ती गावातून हद्दपार व्हावी, या उद्देशाने बोथली येथील प्रज्ञाशिल महिला मंडळाच्या सर्व महिला एकत्र आल्या आणि त्यांनी या मागणीसाठी नागभीड पोलीस ठाण्याला धडक देण्याचा निर्णय घेतला. ठरल्यानुसार सोमवारी ६० ते ७० च्या संख्येत असलेल्या या महिलांनी येथील पोलीस ठाण्यात धडक देवून ठाणेदारांना निवेदन दिले व बोथली येथे संपूर्ण दारुबंदीसाठी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)