पाण्यासाठी सावलीतील महिला धडकल्या नगरपंचायतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:08+5:302021-02-09T04:31:08+5:30

सावली सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. जीवन प्राधिकरण योजना व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. ...

Women in the shade hit the Nagar Panchayat for water | पाण्यासाठी सावलीतील महिला धडकल्या नगरपंचायतीवर

पाण्यासाठी सावलीतील महिला धडकल्या नगरपंचायतीवर

Next

सावली सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. जीवन प्राधिकरण योजना व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या सावली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या कामात पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजनांच्या जलवाहिन्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शहरवासीयांवर विहिरीचे पिण्यास अयोग्य असलेले पाणी पिण्याची वेळ आली आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची तोडफोड झाल्याने यावर पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना मात्र प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. आता उन्हाळा सुरू होत असून पाण्यासाठी महिलांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सावली शहराचा पाणीपुरवठा नियमित करावा व पाणीपुरवठा बंद असलेल्या महिन्याचे बिल माफ करावे, अशी मागणी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महिलांनी दिला. या वेळी माजी नगरसेवक नीलम सुरमवार, छाया सूरमवार, विशाखा गेडाम, भारती चौधरी, सुरेखा संगमवार, चंदाताई सुरमवार, पौर्णिमा गेडाम, हेमलता मोहुर्ले, भारती मोहुर्ले, सुजना मोहुर्ले, ज्योती कोसरे, सरिता कोसनकार, टीना मोहुर्ले आदी महिला उपस्थित होत्या.

कोट

नियोजनाअभावी सावली शहराला पाणीपुरवठा होत नसून याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांवर पिण्यास योग्य नसलेल्या विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तीव्र उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, पाणी समस्या घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- रोशन बोरकर, शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सावली

Web Title: Women in the shade hit the Nagar Panchayat for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.