महिलांनी आत्मनिर्भर होवून समाजसेवा करावी
By admin | Published: February 15, 2017 12:49 AM2017-02-15T00:49:31+5:302017-02-15T00:49:31+5:30
महिलांसाठी विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्या-त्या क्षेत्राची निवड करून चांगले काम केल्यास ....
डी.के. आरीकर : राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डतर्फे महिला संमेलन
चंद्रपूर : महिलांसाठी विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्या-त्या क्षेत्राची निवड करून चांगले काम केल्यास महिलांना आत्मनिर्भर होवून समाजाचीही सेवा करता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय महिला संमेलनात बोलताना दलितमित्र डी.के. आरीकर यांनी केले.
केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या वतीने शिवाजीनगर तुकूम येथील सामाजिक सभागृहात नुकताच महिला सबलीकरणाच्या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डी.के. आरीकर उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाचे शिक्षण अधिकारी रत्नपारखी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. भगवान पाटील, डॉ. देव कन्नाके, सरिता मालू, अंगणवाडी अधीक्षक रामटेके, प्रियंका वरघने, रजनी चिंचोळकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी महिलांनी कोणते क्षेत्र निवडल्यास अधिक प्रगती करता येईल, यावर रत्नपारखी यांनी मार्गदर्शन केले. रामटेके यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
डॉ. देव कन्नाके यांनी महिलांचे आरोग्य चांगले कसे ठेवता येईल, यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. भगवान पाटील यांनी महिलांना कायदेविषयक माहिती दिली.
प्रास्ताविक सरिता मालू यांनी केले. संचालन प्रियंका वरघने यांनी आणि आभार रजनी चिंचोलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना गिरडकर व उषाताई मेश्राम यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)