अवैध दारू विक्रेत्यांवर महिला ठाणेदारांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 01:36 AM2017-01-26T01:36:16+5:302017-01-26T01:36:16+5:30

तालुक्यातील अनेक दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी छापा घालून त्यांच्याकडील दारू हस्तगत करुन कठोर कारवाई केल्याने स्थानिक परिसरातील अवैध दारू

Women Thane Dasara's gray eyes on illegal liquor vendors | अवैध दारू विक्रेत्यांवर महिला ठाणेदारांची करडी नजर

अवैध दारू विक्रेत्यांवर महिला ठाणेदारांची करडी नजर

googlenewsNext

नागरिकांना दिलासा : धाडसत्रामुळे दारू विक्रेते भूमिगत
पोंभुर्णा : तालुक्यातील अनेक दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी छापा घालून त्यांच्याकडील दारू हस्तगत करुन कठोर कारवाई केल्याने स्थानिक परिसरातील अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. दारू तस्करांवर पोंभुर्णा येथील महिला ठाणेदार किन्नाके यांनी करडी नजर ठेवली असल्याने सध्या तरी परिसरात दारु विक्रीचे प्रमाण चांगलेच कमी झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना काही दारू व्यवसायिक अनेक गावात अवैधरित्या दारू व्यवसाय करीत होते. त्यांच्यावर अंकुश ठेऊन येथील महिला ठाणेदार निर्मला किन्नाके यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह अनेक ठिकाणी छापा मारुन त्यांच्याकडील अवैध असलेला दारूसाठा जप्त केला व त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या कामात पोंभुर्णा ठाण्यातील पोलीस शिपाई देवा खेडकर यांची कामगिरी फार महत्वाची असल्याचे महिला वर्गाकडून बोलल्या जात आहे. अनेक ठिकाणी तर वेगवेगळ्या छुप्या मार्गाचा अवलंब करुन दारु विक्रेते दारु विक्री करीत होते. दरम्यान, दारु पिऊन चौकात बडबड करीत असलेल्या तळीरामाबाबत परिसरातील महिलांना माहिती देऊन ठेवली होती. एखादा तळीराम बडबड करताना दिसला की ठाणेदार किन्नाके यांना दूरध्वनीवरुन माहिती देण्यात येत होती. ठाणेदारांनी देवा नामक पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी जाऊन दारू पिऊन बडबड करुन शिविगाळ करीत असलेल्या तळीरामाच्या कानशिलात देऊन दारु कुठून पिल्याचे वदवून घेत होते. त्यावेळी सदर तळीराम त्यांना ज्या ठिकाणी दारु प्यायला, त्या ठिकाणी घेऊन जात होता आणि पोलिसांना त्यांच्याकडील दारु पकडणे सोपे जात होते. एकंदरीत महिला ठाणेदार यांच्या वेगवेगळ्या दारु पकडण्याच्या शैलीने स्थानिक परिसरातील दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. परिसरामध्ये सध्या तरी फार अल्प प्रमाणात दारु मिळत असल्याने स्थानिक परिसरातील दारु शौकीन केळझर सारख्या ठिकाणी जाऊन आपला शौक पूर्ण करीत असल्याचे दारु शौकीनांकडून बोलले जात आहे.
तालुका परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गस्त ठेऊन एका हप्त्यामध्ये आठ दारु विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर दारुबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यामध्ये दारु विक्रेते मधु इंद्रबहादूर बोहरा, प्रविण श्रीनिवास खोब्रागडे, जयपाल श्रावण खोब्रागडे, प्रतिक रवींद्र रामटेके, जयपाल कावरुजी खोब्रागडे, रवींद्र विजय बोबाटे, मिठाई देवाजी निमसरकार, वाल्मीक परशुराम निमगडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. या कारवाया ठाणेदार निर्मला किन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई देवीदास खेडकर, अविनाश झाडे, बालद जाधव यांनी केल्या आहेत. पोलीस विभाग यशस्वी कामगिरी बजावत असल्याने परिसरामध्ये अवैध दारुविक्रीवर लगाम बसला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women Thane Dasara's gray eyes on illegal liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.