‘त्या’ महिलांची न्यायालयातून जामिनावर सुटका
By Admin | Published: July 14, 2014 11:51 PM2014-07-14T23:51:41+5:302014-07-14T23:51:41+5:30
पोंभुर्णा येथील पालकमंत्री संजय देवतळे यांच्या सभेत दारूबंदीबाबत जाब विचारायला गेलेल्या महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल असलेल्या महिलांची सोमवारला चंद्रपूर न्यायालयातून
चंद्रपूर : पोंभुर्णा येथील पालकमंत्री संजय देवतळे यांच्या सभेत दारूबंदीबाबत जाब विचारायला गेलेल्या महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल असलेल्या महिलांची सोमवारला चंद्रपूर न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची सतत मागणी होत असतानाही या मागणीच्या पुर्ततेसाठी शासनाकडे गांभीर्याने विषय नेला नाही, असा आरोप महिलांचा पालकमंत्र्यांवर होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे निमित्त साधून पोंभुर्णा येथे कार्यक्रमात पालकमंत्री भाषण देत असताना महिलांनी ‘दारूबंदीसाठी महिला जेलमध्ये जात असताना तुम्ही कुठे होता, चंद्रपूर जिल्हा दारूबंदी कधी होणार’ असा जाब त्यांना विचारला. पोलिसांनी जाब विचारणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले. गुन्हे दाखल केले. मात्र तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांनी या महिलांना अटक करून चंद्रपूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या महिलांची जामिनावर सुटका केली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ एप्रिलला क्लब ग्राऊंड येथील जाहीर सभेत ‘लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्हा दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल’ असे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी आपले आश्वासन अद्याप पुर्ण केले नाही. मात्र दारूबंदी करणाऱ्या महिलांवर अटकेची कारवाई केली आहे. शासनाने दारूबंदी आंदोलनसंदर्भात गुन्हे मागे घेण्याचे शासन निर्णय जाहीर केले आहे. मात्र त्याचे पालन नाही.(शहर प्रतिनिधी)