महिला स्वाधारगृह बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:49 PM2018-08-22T22:49:41+5:302018-08-22T22:50:15+5:30
केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
नारद प्रसाद ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारद्वारा अनुदानित राज्यातील निराधार महिला व मुलींचे स्वाधार गृह बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून या स्वाधार गृहांना अनुदान दिलेले नसल्यामुळे ही बिकट परिस्थिती उद्भवली आहे. आज ना उद्या शासनाकडून अनुदान प्राप्त होतील या आशेवर स्वाधार गृहाचे संचालक जुळवाजुळव करून ते चालवत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तीन स्वाधार गृह आहेत. यामध्ये चंद्रपूर येथील क्रिष्णानगरात सरस्वती शिक्षण मंडळ संचालित स्त्री स्वाधार गृह, गोपालपुरी येथे स्नेह स्वाधारगृह व ब्रह्मपुरी येथे राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित स्वाधार गृह आहे.
यामध्ये घटस्फोटीता, हुंडाबळी, कुमारी माता, निराधार, समस्याग्रस्त, विधवा, देवदासी, मानसिक रुग्ण असलेल्या १८ ते ४५ वर्यापर्यंतच्या महिलांना ठेवले जातात. हे स्वाधारगृह अनुदानाविना अडचणीत आले आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाचे अधिकारी व्ही.के. मरसाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थांचा मूल्यांकन अहवाल शासनाला पाठविला आहे. या अनुषंगाने येत्या २४ आॅगस्टला मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये याबाबत काही निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
राज्य शासन करणार मुल्यांकन
स्त्री आधार केंद्राला केंद्र सरकारकडून पूर्ण अनुदान मिळत होते. परंतु २०१५-१६ पासून केंद्राने ६० टक्के अनुदान देणे सुरू केले. ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागते. केंद्र सरकारने आपला वाटा दिलेला आहे. मात्र राज्य सरकारने आता स्वाधार केंद्राचे मूल्यांकन करणे सुरू केले आहे. मुल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पात्र संस्थांना योग्य अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण अधिकारी व्ही. के. मरसाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आश्रम चालविण्यात मोठी अडचण - खोब्रागडे
गेल्या तीन वर्षांपासून अनुदान मिळत न मिळाल्यामुळे स्वत:च्या पैशातून आश्रम चालवत आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वस्त धान्यसुद्धा मिळणे बंद आहे. अशा परिस्थितीत स्वाधार गृह चालविणे कठीण झाले असल्याची माहिती मागील २५ वर्षांपासून ब्रह्मपुरीत स्वाधार गृह चालवित असलेल्या संस्थेच्या सचिव सरिता खोब्रागडे यांनी दिली.
बिकट प्रश्न उभा आहे - पोटदुखे
स्नेह स्वच्छ गोर गोपालपुरीच्या संचालक शोभा पोटदुखे म्हणाल्या, ७ कर्मचारी आणि ३० महिला आहेत. सरकारने तीन वर्षांपासून अनुदान अडवून ठेवले आहे. राज्य सरकारने अनुदान दिले नाही. अनुदान मिळत नसल्यामुळे स्वाधार गृह कसे चालवायचे हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.