रोहयोतून होणार १२६ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:32 PM2018-01-30T23:32:51+5:302018-01-30T23:33:24+5:30

शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात.

Work of 126 crores will be done through Roho | रोहयोतून होणार १२६ कोटींची कामे

रोहयोतून होणार १२६ कोटींची कामे

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पुढाकार : ४१.८४ लाख मनुष्यदिन निर्मिती अपेक्षित

मंगेश भांडेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून जिल्हाभरात १२६.९० लाखांची रोहयोची कामे प्रस्तावित केली आहेत. यांमुळे ४१.८४ लाख मनुष्यदिन निर्मितीची अपेक्षा आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत ‘मागेल त्याला काम’ देण्याची शासनाची योजना आहे. नोंदणीकृत रोहयो मजुरांना वर्षभरात शंभर दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के ग्रामपंचायतस्तर व ५० टक्के यंत्रणास्तरावरील पुरवणी नियोजन आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. पंचायत समिती पोंभूर्णा व नागभीडने आपल्या रोहयो कामांचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर केला होता. या दोन्ही पंचायत समित्यांनी आपल्या तालुक्यात १२ हजार ६६३ रोहयोची कामे प्रस्तावित करून त्याकरिता ५५२५.५२ अकुशल तर ३६८३.६८ कुशल असे ९२०९.२१ लाख खर्च अपेक्षित असलेले २८.६६ लाख मनुष्यदिन निर्मितीची कामे सादर केली आहे.
तर जिल्हाधिकाºयांनी चंद्रपूर, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना, राजुरा, मूल तालुक्यात विविध यंत्रणेमार्फत १९९४ कामांचे पुरवणी नियोजन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे आदेश दिले. या कामांच्या अकुशल बाबींवर २४९६.२५ तर ९८४.७६ कुशल, असे ३४८१.४१ लाख रुपये खर्च अपेक्षित असून १३.१८ लाख मनुष्यदिन निर्मिती होणार अशी अपेक्षा आहे.
सर्व तालुक्यांमध्ये पंचायत समिती व ग्रामपंचायतमार्फत कृषी विभाग, वन विभागातंर्गत मजगी, रोपवाटीका, जलसंधारण, वृक्षलागवड, वनीकरण, रस्ता दुतर्फा व रोपवाटिका लागवड, मिश्र रोपवन आदी १४ हजार ६५७ कामे जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. या सर्व कामांना ५० टक्के यंत्रणा व ५० टक्के ग्रामपंचायतस्तर अशा नियोजन आराखड्यास जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात रोहयोंतर्गत ही सर्व कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण बेरोजगार नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.
उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य हवे
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक बड्या कंपन्यांचे उद्योग स्थापन आहेत. या उद्योगांमुळे स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मात्र या उद्योगांमध्ये काम करणारे मजूर स्थानिक कमी आणि परप्रांतीय जास्त असल्याने स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात स्थलांतर व्हावे लागत आहे. शेती हंगाम सोडला, तर मजुरांना काम मिळत नाही. रोहयोची कामे दिलासा देणारी असली तरी स्थानिक उद्योगांमध्ये बारमाही कामे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Web Title: Work of 126 crores will be done through Roho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.