पैनगंगा नदीवरील पुलाच्या १३ पिल्लरचे काम पूर्ण
By admin | Published: October 14, 2016 01:30 AM2016-10-14T01:30:40+5:302016-10-14T01:30:40+5:30
नजीकच्या पैनगंगा नदीवर विरुर गावाजवळ वेकोलिकडून ३२ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येत असलेल्या पाचशे मिटर लांब पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गडरचे काम युद्ध पातळीवर : जानेवारी २०१७ पर्यंत काम होणार पूर्ण
घुग्घुस : नजीकच्या पैनगंगा नदीवर विरुर गावाजवळ वेकोलिकडून ३२ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येत असलेल्या पाचशे मिटर लांब पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाचे १३ पिल्लरचे काम पूर्ण झाले आहे. गडरचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जानेवारी २०१७ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करून वेकोलिला हस्तांतरण करण्याचा मानस आहे. या पुलामुळे पैनगंगा कोळसा ते घुग्घुस रेल्वे सायडिंगचे सुमाारे २०-२५ किमी अंतर कमी होणार आहे.
मागील वर्षी कोळसा उत्पादनाचे लक्ष असलेल्या वेकोलि वणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पैनगंगा कोळसा खाणीचे भूमिपूजन २२ मार्च २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत झाले. नियोजनाप्रमाणे कोळसा उत्खननाचे काम सुरू झाले. त्यात वेकोलिने पुलाचे बांधकाम करण्याचा अंतर्भाव होता. नोव्हेंबर २०१५ ला पुलाचे काम सुरू झाले. बांधकामादरम्यान पावसाळा आणि अनेक अडचणी आल्या. मात्र कंपनीनग काम बंद पडू दिले नाही.
वर्तमान स्थितीत स्टेट गडर हायटेक्नॉलाजी सिस्टीम पुलाच्या तेराही पिल्लरचे काम पूर्ण करून गडर बसविण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. सदर पुलाचे काम पूर्ण करून जानेवारी २०१७ पर्यंत वेकोलिला पूल हस्तांतरण करण्याचा मनोदय कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जगदीश शर्मा, वरिष्ठ अभियंता प्रविण सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (वार्ताहर)