उमा नदीवरील पुलाचे काम युद्धपातळीवर
By admin | Published: January 6, 2016 01:23 AM2016-01-06T01:23:05+5:302016-01-06T01:23:05+5:30
मूल तालुक्यातील भेजगाव जवळील उमा नदीवरील पूल वर्षभरापूर्वी दबला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने जवळपास १५ गावाचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला.
पालकमंत्र्यांचा पुढाकार : १० कोटींचा निधी
भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव जवळील उमा नदीवरील पूल वर्षभरापूर्वी दबला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने जवळपास १५ गावाचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला. याची दखल घेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूल बांधकामासाठी १० कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे या पुलाचे काम डिसेंबर महिन्यापासून युद्धपाळतीवर सुरु झाले आहे.
पूल बदल्याने या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे परिसरातील प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मूल-चिचाळा-भेजगाव हा रस्ता दर्जेदार करून त्यास प्रजिमा- २३ असे संबोधन्यात येणार आहे. या रस्त्यावर चाळीस वर्षापूर्वी आर्च काजवे प्रकारचा पूल बांधण्यात आला. त्यावरून वाहतूक सुरु होती. मात्र पुलाची उंची फारच कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये जवळपास तीन महिने वाहतूक बंद राहत होती. त्यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उमा नदीवर पूल बांधकाम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करुन भुपृष्ठ मंत्रालयाकडून १० कोटी रुपये मंजुर केले. या रक्कमेतून मोठ्या पूलाचे बांधकाम होणार आहे. प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरु असल्याने पूलाची समस्या लवकरच मार्गी लागणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. (वार्ताहर)