चौपदरीकरणाच्या काठावरील सिमेंट नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: August 19, 2014 11:38 PM2014-08-19T23:38:21+5:302014-08-19T23:38:21+5:30
आनंदवन चौक ते बाम्हणीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या दोन्ही बाजुने सिंमेट नाल्याचे बांधकाम सुरू असून या सिमेंटच्या नाल्याला अनेक ठिकाणी तडे
वरोरा : आनंदवन चौक ते बाम्हणीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या दोन्ही बाजुने सिंमेट नाल्याचे बांधकाम सुरू असून या सिमेंटच्या नाल्याला अनेक ठिकाणी तडे तर नाल्यावर टाकण्यात आलेल्या आच्छादनाला अल्पावधीत भगदाडे पडणे सुरू झाले आहे. त्यावरुन चालताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
रस्ता चौपदरीकरणासोबतच आनंदवन चौक, रत्नमाला चौक व बोर्डा चौकालगत दोन्ही बाजुने सिमेंट नाल्याचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. अनेक ठिकाणी खोदकाम केल्याने नागरिकांना या रस्त्यावर येण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत आहे. नाल्याचे काम सुरू असताना त्यातील पाणी बाहेर काढले जात नाही व त्यावर काँक्रीटही टाकले जात आहे. त्यानंतर नाल्यावर सिमेंट काँक्रीटचे आच्छादन टाकण्यात येत आहे. त्या आच्छादनाला भगदाड पडणे सुरू झाले आहे. या नाल्याच्या खोदकामातील माती अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी पडली असल्याने पाऊस आला की, रस्ते चिखलमय होतात. त्यामुळे नागरिकांना दुचाकी वाहनाने व पायदळ चालणे कठीण झाले आहे. या खोदकामात जमिनीखाली असलेल्या केबल पाईपचा विचार केला जात नसल्याने नळाचे पाईप फुटले आहेत. परिणामी वरोरा शहरात अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. केबल तुटल्याने अनेक भागातील दूरध्वनी सेवा व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र भगदाडे तशीच आहेत. या भगदाडावर आच्छादन टाकले नसल्याने जनावरांसह नागरिकही या नालीत पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरदेखील कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)