१२ वर्षांपासून घोडाझरी उपकालव्याचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:23+5:30
गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ किमी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात पाणी सोडले जात आहे. तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. दहा वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झाले होते. मात्र अजुनही अर्धवटच आहे. हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला. कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार केले.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातून गेलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे काम कासवगतीने सुरू आहे. बांधकामाला १२ वर्षे झाले. मात्र, कालव्याचे निम्मे बांधकाम पूर्ण झाले. प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालव्यापाासून शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. तर दुसरीकडे कालव्याच्या मातीचे ढिगारे उभे झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि १०७ किमी लांबीचा उजवा कालवा ब्रह्मपुरी तालुक्यातून सावलीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून आसोला मेंढा तलावात पाणी सोडले जात आहे. तालुक्यातून घोडाझरी उपकालवा गेला आहे. दहा वर्षांपूर्वी उपकालव्याचे काम सुरू झाले होते. मात्र अजुनही अर्धवटच आहे. हा कालवा पान्होळी, मेंढा, किरमिटी, नवेगाव पांडव, कोदेपार येथून गेला. कालव्यातून निघालेल्या मातीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे डोंगर तयार केले. त्यामुळे शेकडो एकर जमीन नापिक झाली आहे.
बांधकाम कंपन्याही बदलल्या
कालव्याचे बांधकाम २००८ मध्ये सुरू झाले. पहिली तीन चार वर्षे काम सुरळीत सुरू होते. त्यानंतर शासनाने काही बांधकाम कंपन्यांची देयके अडवली. त्यामुळे काही कंपन्यांनी काम सोडल्याने तीन वर्षे बंदच होते. आता काही ठिकाणी नवीन कंपन्यांनी कामे घेतली. या कंपन्यांकडून कालव्याचे बांधकाम सुरू आहे.
शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत
उपकालव्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. यातील बहुतेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला तर काही शेतकरी प्रतीक्षेत आहेत. कालव्यासाठी ठिकठिकाणी निर्माण झालेले मातीचे डोंगर शेतीसाठी त्रासदायक झाले. बांधकाम पूर्ण न झाल्याने शेतीला पाणीही मिळत नाही, असे आजचे वास्तव आहे.