दोन वर्षांपासून गोविंदपूर-येनोली रस्त्याचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:57+5:302021-05-27T04:29:57+5:30
तळोधी हे गाव मुख्य चंद्रपूर-नागपूर महामार्गावर आहे. येथून गोविंदपूर या जंगलव्याप्त मार्गाने चिमूरला जाता येते, तसेच येनोली माल व ...
तळोधी हे गाव मुख्य चंद्रपूर-नागपूर महामार्गावर आहे. येथून गोविंदपूर या जंगलव्याप्त मार्गाने चिमूरला जाता येते, तसेच येनोली माल व इतर मार्गानेही चिमूरला जाता येते. मात्र, हे सर्व रस्ते कमकुवत झालेले आहेत. कुठल्या रस्त्यावर गिट्टी उखडली आहे, तर कुठल्या रस्त्यावर डांबर गायब झालेले असून, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गोविंदपूर परिसरात अनेक उपरस्ते आहेत. मात्र, एकही रस्ता सुरळीत नाही. यापैकी चिमूरला जाणाऱ्या गोविंदपूर-तळोधी-येनोली माल आदी रस्त्यांवर दोन वर्षांपासून गिट्टी टाकून ठेवली आहे. मात्र, अजूनपर्यंत हे अपूर्णावस्थेतील रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले नाही. येथे टाकलेली गिट्टी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सदर रस्त्यांवरून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, संबंधित विभागाचे या रस्त्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. सदर रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोट
गोविंदपूर, येनोली माल गावांचा हा जंगलाने व्यापलेला परिसर आहे. येथे नेहमीच वाघांची वहिवाट असते. येथील अनेक मार्ग चिमूर आणि तळोधीला जोडतात. दोन वर्षांपासून येथील मार्गावर गिट्टी पडून आहे. मात्र, काम पूर्ण करण्यात आलेले नाही. हे काम बांधकाम विभागाकडे आहे.
- अमोल बावनकर, सरपंच, ग्रामपंचायत, येनोली माल.