ग्रामपंचायतींची कामे ठप्प
By admin | Published: November 12, 2016 12:48 AM2016-11-12T00:48:28+5:302016-11-12T00:48:28+5:30
चिमूर पंचायत समितीपासून सुरु झालेल्या ग्रामसेवकांच्या असहकार आंदोनाने मोठे रुप धारण केल्याने जिल्हाभर
ग्रामसेवकांचे आंदोलन : जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष
चंद्रपूर : चिमूर पंचायत समितीपासून सुरु झालेल्या ग्रामसेवकांच्या असहकार आंदोनाने मोठे रुप धारण केल्याने जिल्हाभर ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन केले. मात्र यावर प्रशासनाने कुठलाच तोडगा न काढल्याने ग्रामसेवक युनियने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे शुक्रवारी ग्रामपंचायत पातळीवरील कामे ठप्प पडली.
कंत्राटी ग्रामसेवकांचा ३ वर्षे सेवाकाळ नियमीत करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना दरमहा प्रवास भत्ता पगारासोबत द्यावे, ग्रामसेवक संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेत बदल करून पदवीधर करावे, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी व इतर यंत्रणा ग्रामसभा सचिव व बदल होणे व ग्रामसभा सुधारणा करणे, २०११ च्या जनगणनेवर आधारीत राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्मीती करावी, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा व्हावी, ग्रामसेवक संवर्गाकरिता वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळण्यासाठी निर्णय घ्यावा, राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करावे अशा १५ मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले.
ग्रामस्तरावर काम करताना नागरिकांसह गावपुढारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याही रोषाला बळी पडून ग्रामसेवक काम करतात. मात्र ग्रामसेवकाच्या अनेक मागण्यासाठी शासनाला वेळोवेळी निवेदन देवूनही ग्रामसेकाच्या मागण्या सुटल्या नसल्याने ग्रामसेवक युनियनने प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची शृंखला सुरु केली असून यात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे काम ठप्प पडल्याने गाव खेड्यातील नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. (स्थानिक प्रतिनिधी)