तहसीलच्या रिक्त पदांमुळे कोरपन्यातील कामाचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:15 IST2025-01-09T15:15:20+5:302025-01-09T15:15:54+5:30

७३ पैकी केवळ ५४ पदेच भरली : काम करताना कर्मचाऱ्यांची दमछाक

Work in Korpana delayed due to vacant tehsil posts | तहसीलच्या रिक्त पदांमुळे कोरपन्यातील कामाचा खोळंबा

Work in Korpana delayed due to vacant tehsil posts

लोकमत न्यूज नेटवर्क 
कोरपना :
तेलंगणा राज्य सीमेवर दुर्गम, आदिवासीबहुल क्षेत्रात १९९२ मध्ये कोरपना तहसील अस्तित्वात आली. या भागात महसूल विभागाची ७३ पदे मंजूर असून, भरलेली पदे अवधी ५४ आहेत. मात्र, तहसील कार्यालयात प्रमुख पद असलेल्या तहसीलदाराचीच जागा २७ सप्टेंबर २०२३ पासून रिक्त असून, राजुरा येथील तहसीलदार यांच्याकडे कोरपनाच्या कार्यालयाचा प्रभार आहे. 


या ठिकाणी विविध उद्योग व वेकोली, रेती घाट, मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा व्याप आहे. अधिक महसूल देणारा म्हणून या तालुक्याची ओळख आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार या दोन जागा रिक्त आहेत तर महसूल सहायक ३ जागा रिक्त आहेत. वर्ग ३च्या महसूल सहायकांची निवडणूक विभागात १ जागा रिक्त आहे. 'रोहयो' अंतर्गत वर्ग ३ची पुरवठा निरीक्षक १ जागा, गोदाम सहायक १ जागा, गोदाम लिपिक १३ जागा, वर्ग ४च्या ३ जागा रिक्त आहेत. 


तलाठीच्या २ जागा तर कोतवाल ५ जागा रिक्त असल्यामुळे एकाच विभागातील टेबलवर २ ते ३ विभागाचे काम असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. या भागात वर्ग रच्या जमिनी वर्ग १ करण्यामध्ये नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्यामुळे अर्धे अधिक टेबल खाली असून नागरिकांना कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत आहेत. कोरपना येथील महसूल विभागाच्या रिक्त जागा तातडीने देण्यात यावे, अशी मागणी सय्यद आबिद अली यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. 


विविध शासकीय कार्यालयातही पदे रिक्त 
कोरपना येथे तहसील कार्यालयासह पंचायत समिती, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग, दुय्यम निबंधक, उपकोषागार अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगरपंचायत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वीज उपकेंद्र आदी कार्यालय आहे. परंतु या सर्व कार्यालयात अनेक पदे रिक्त आहे. यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम जाणवतो आहे.

Web Title: Work in Korpana delayed due to vacant tehsil posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.