गोसीखुर्द प्रकल्पाच्या कापसी कालव्यावरील काम अपूर्णावस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 02:32 PM2024-07-15T14:32:30+5:302024-07-15T14:33:32+5:30
Chandrapur : चार गावांतील सिंचन व्यवस्था संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
उपरी : गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील गावाशेजारून गुरे-ढोरे व लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दोनशे मीटर लांबीचा बोगदा (सुरक्षा कवच) निर्माण करण्याचे काम कापसी गावाशेजारी मे महिन्यापासून सुरू आहे. ते काम कासवगतीने सुरू असून अपूर्णावस्थेत असल्याने त्या कालव्यातून पाणी पुढे जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या चार गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहणार आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत सावली तालुक्यातील असोलामेंढा तलावाखालील क्षेत्रात शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेले लहान-मोठे कालव्यांचे जाळे संपूर्ण सावली तालुक्यात पसरले आहे. अनेक कालवे गावाशेजारून नागरिक व गुरे - ढोरे ये-जा करण्याच्या मार्गावरून गेले आहेत. मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने आणि कालव्यांचा आतील भाग सिमेंट काँक्रिटचा बनविण्यात आल्याने पाळीव आणि जंगली प्राण्यांना कालवा ओलांडून पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागत असे. पावसाच्या वेळी तर अनेक जनावरे कालव्यांत फसण्याची भीती निर्माण झाली होती. तर गावाशेजारून गेलेल्या कालव्यामुळे गावातील लहान मुले आणि गावातील गुराढोरांना कालव्यात पडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने अशा कालव्यांवर गावाशेजारी कमीतकमी दोनशे मीटरचे सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी एका कंपनीकडे काम सोपविले. परंतु ती कंपनी हे काम कासवगतीने करीत असल्याने ते काम अपूर्ण असून कालव्यावर लावण्यात आलेले लोखंडी सळाखे मोकळी आहेत.
कालव्याचे पाणी पुढे जाण्यास अडचण
या कालव्याच्या पुढे जाणारे पाणी, पाण्याच्या प्रवाहाने येणारा कचरा या ठिकाणी साचणार असल्याने कालव्याचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. परिणामी या कालव्यावरील येणाऱ्या उपरी, भांसी, डोनाळा, कढोली या गावांतील हजारो एकर शेती सिंचनापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर या अपूर्ण कामामुळे गावातील नागरिक, लहान मुले, जनावरांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.