सात वीज उपकेंद्रांची कामे सुरू
By admin | Published: June 25, 2017 12:34 AM2017-06-25T00:34:43+5:302017-06-25T00:34:43+5:30
मागील काही वर्षापासून वरोरा व भद्रावती तालुक्यात वीज ग्राहकांना कमी उपकेंद्र असल्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडचणी निर्माण होत होत्या.
वरोरा व भद्रावती तालुका : बाळू धानोरकर यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील काही वर्षापासून वरोरा व भद्रावती तालुक्यात वीज ग्राहकांना कमी उपकेंद्र असल्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडचणी निर्माण होत होत्या. या अडचणींवर मात करण्याकरिता वरोरा व भद्रावती तालुक्यात सात नवीन उपकेंद्रांना मंजुरी आणण्याकरिता पुढाकार घेतला. त्यात सातही उपकेंद्रांची कामे प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसांत हे उपकेंद्र कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती आ. बाळू धानोरकर यांनी दिली.
वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील कार्यालय परिसरात आ. धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, वरोरा उपकार्यकारी अभियंता विनोदकुमार भोयर, भद्रावती उपकार्यकारी अभियंता सचिन बदखल, वरोरा न.प. गटनेता गजानन मेश्राम, वरोरा बाजार समिती सभापती विशाल बदखल, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, उपसभापती राजू चिकटे, नगरसेवक राजू महाजन, बाजार समिती संचालक दत्ता बोरेकर, प्रमोद मगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, भद्रावती न.प. उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, युवराज मोरे, भद्रावती शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर ताजने आदी उपस्थित होते.
भद्रावती व वरोरा तालुक्यात पिरली (धानोली), एमआयडीसी, भद्रावती, मुधोली, कोंढा, नागरी, वणी रोड, वरोरा आदी सात ठिकाणी वीज उपकेंद्र होणार असून त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या काही दिवसात ते कार्यान्वित होणार आहेत. तसेच वरोरा तालुक्यातील पांझुर्णी व सावरी येथे ३३ केव्ही उपकेंद्र जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहे. मार्च-२०१७ अखेरीस वरोरा तालुक्यात ६२२ व भद्रावती तालुक्यात १७९ अशा ८०१ कृषिपंप जोडणी करण्यात आलेली आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वरोरा व भद्रावती तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्या समस्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यावर आ. धानोरकर यांनी वीज ग्राहकांच्या समस्या किती दिवसात सोडविणार, याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. वीज ग्राहकांच्या समस्या विहीत मुदतीत सोडविल्या गेल्या नाहीत. तर ग्राहकांना आपल्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.