काम तर दिले नाही, उलट मारहाण केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:32 AM2021-09-22T04:32:07+5:302021-09-22T04:32:07+5:30
तोहोगाव : काम मागायला गेलो असता भाजपाच्या माजी सभापतीने मारहाण केली. त्यानंतर गावात पोलीस आले. त्यांनीही मारहाण केली. तक्रार ...
तोहोगाव :
काम मागायला गेलो असता भाजपाच्या माजी सभापतीने मारहाण केली. त्यानंतर गावात पोलीस आले. त्यांनीही मारहाण केली. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेलो असता तिथेही जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप सोनापूर येथील विजय येवले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दरम्यान, माजी सभापती दीपक सातपुते यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले.
गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) येथील विजय येवले (३५) यांनी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य दीपक सातपुते यांचे घर गाठून कामाची मागणी केली.
गावात अनेक कामे सुरू आहेत. मलादेखील कामावर घ्या, अशी विनंती केली. मात्र, काम नाही, असे उत्तर सातपुते यांनी दिले. त्यानंतर मात्र आपण काम द्यावे, अशी वारंवार विनंती केली. यामुळे संतापून सातपुते यांनी आपणाला बेदम मारहाण केल्याचे येवले यांनी सांगितले. त्यानंतर सातपुते यांनी लाठी येथील ठाणेदार पारडकर यांना बोलावून घेतले. पोलीस तिथे आले आणि त्यांनीही आपणाला मारहाण केली, असे येवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा प्रकार १२ सप्टेंबरला रात्री ८ वाजता घडला. मारहाणीत दुखापत झाल्याने मी घराच्या बाहेर निघू शकलाे नाही. त्यानंतर १४ सप्टेंबरला लाठी पोलिसात तक्रार द्यायला गेलो. मात्र, तक्रार न घेता ठाणेदार पराडकर यांनी ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप येवले यांनी केला आहे. आपणाला न्याय मिळावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचेही येवले यांनी सांगितले.
कोट
घरी गणपतीची आरती सुरू असताना येवले यांनी अंगणात येऊन शिवीगाळ केली. त्याला प्रेमाने बाहेर जाण्यास सांगितले. मी अथवा माझ्या कोणत्याच सहकाऱ्याने मारहाण केली नाही.
- दीपक सातपुते, माजी सभापती.
कोट
मारहाणीचा आरोप खोटा
आहे.
दोघांच्याही तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या आहेत. मी मारहाण केली नाही. माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही.
-मिलिंद पारडकर, ठाणेदार, लाठी पोलीस स्टेशन.