कामगारदिनी कामगार चढले टॉवरवर
By admin | Published: May 2, 2017 12:58 AM2017-05-02T00:58:48+5:302017-05-02T00:58:48+5:30
मागील पाच महिन्यापासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जीएमआर कंपनीतील कामगार वारंवार निवेदन देत होते.
वरोरा : मागील पाच महिन्यापासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जीएमआर कंपनीतील कामगार वारंवार निवेदन देत होते. त्यातील काही कामगारांना कंपनीने सेवेतून काढून टाकले. याच्या निषेधार्थ व मागण्या कंपनीने मान्य कराव्यात, याकरिता जीएमआर कंपनीचे सात कामगार कामगारदिनी वरोरा शहरातील अंबादेवी वॉर्डातील भ्रमणध्वनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले.
जीएमआर पॉवर कामगार संघटना वरोराचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात मागील पाच महिन्यापासून कामगारांनी विविध मागण्याकरिता आंदोलन सुरु केले आहे. वारंवार कंपनी व प्रशासनाला निवेदन दिले. मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. मागण्यामध्ये स्थानिक कामगारांची परप्रांतात केलेले स्थानांतरण रद्द करण्यात यावे, वेतनाची स्लीप देण्यात यावी, पीएफ कपात करण्यात यावे, कंपनी कायदा १९४८ नुसार अंमलबजावणी करण्यात यावी, कामगारांना बोनस देण्यात यावा, १२ तासांऐवजी आठ तास काम द्यावे, कंत्राटी कामगारांना कंपनीने सामावून घ्यावे, कंत्राट पद्धत बंद करावी आदींचा समावेश आहे. या मागण्यांसाठी कामगारांनी पाच महिन्यापासून जीएमआर कंपनी व प्रशासनास निवेदन दिले. प्रशासनासोबत चर्चा केली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. उलट अनेक कामगारांना सेवेतून काढून टाकले. त्यामुळे आज सोमवारी कामगार दिनी सुरेंद्र बन्सोड, अजय पेंदोर, अमोल ठोंगे, भूषण उमरे, राजू मोहुर्ले, सुनील कुमरे, दिलीप कुत्तरमारे, मंगेश करंबे हे कामगार टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कामगार संघटना आंदोलन आणखी तिव्र करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)