धारीवाल प्रशासनाच्या विरोधात कामगारांचा संप
By admin | Published: July 28, 2016 01:31 AM2016-07-28T01:31:06+5:302016-07-28T01:31:06+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीतील कामगारांनी बुधवारी पहाटेपासून प्रशासनाच्या विरोधात संप पुकारला आहे.
घोडपेठ : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीतील कामगारांनी बुधवारी पहाटेपासून प्रशासनाच्या विरोधात संप पुकारला आहे. प्रशासनाने चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी कामगार नेते दिनेश चोखारे यांनी केली आहे.
ताडाळी येथील धारिवाल पॉवर कामगार संघटना एमआयडीसीतर्फे ९ जुलै रोजी धारिवाल प्रशासनाला मागण्यांचे पत्र सोपविण्यात आले होते. या पत्राची प्रतिलीपी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सहाय्यक कामगार आयुक्त, उपसंचालक (आरोग्य व सुरक्षा) तसेच पडोलीचे ठाणेदार यांनासुध्दा देण्यात आली होती.
या पत्रातील मागण्या मान्य न झाल्यास २७ जुलै रोजी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल येईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार मागण्यांवर तोडगा न निघाल्याने धारिवाल पॉवर कामगार संघटनेतर्फे कामगारांचा संप पुकारण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजेपासून कामगारांनी बेमुदत संपाला सुरूवात केली आहे.
सकाळी ११ वाजता संघटनेतर्फे दिनेश चोखारे यांच्या अध्यक्षतेखाली ताडाळी येथील साखरवाही फाटा परिसरात संपात सहभागी असलेल्या कामगारांची सभा घेण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रवक्ते बाळकृष्ण जुवार, रमेश बुच्चे, सचिन कत्याल, पवन अगदारी, संतोष बांदूरकर, रूपेश झाडे, सचिन विरूटकर प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)
सध्या ताडाळी येथील एमआयडीसी ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची एमआयडीसी समजली जाते. या एमआयडीसीमध्ये धारिवाल ईन्फ्रास्ट्रक्चर लिमी. हा ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. सोबतच इतरही अनेक प्रकल्प या एमआयडीसीमध्ये आहेत. जिल्ह्यातील नविन उद्योगांवर असलेली बंदी नुकतीच उठविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी नविन उद्योगांना येण्यासाठी प्रवेशद्वार खुले झाले आहे. मात्र, जुन्या उद्योगांची अवस्था अतिशय दयनीय आहे. याठिकाणी असलेले बरेचशे प्रकल्प हे बंद अवस्थेत आहेत. परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशातच कामगारांनी पुकारलेला हा संप कोणते वळण घेईल, याकडे परिसरातील उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.