कामगारदिनी कामगारांची रॅली
By admin | Published: May 3, 2017 12:51 AM2017-05-03T00:51:10+5:302017-05-03T00:51:10+5:30
१ मे कामगार दिनाचे औचित्य साधून सीआयटीयूचे राज्य उपाध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांचे नेतृत्वात विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी गांधी चौकातून विशाल मोर्चा काढण्यात आला.
पालकमंत्र्यांना निवेदन : अनेक कामगारांची उपस्थिती
चंद्रपूर : १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून सीआयटीयूचे राज्य उपाध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांचे नेतृत्वात विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी गांधी चौकातून विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अंगणवाडी महिला, वनकामगार, मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगार, थर्मल पॉवर स्टेशन मधील कामगार तसेच आशा वर्कर हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित महिला व पुरुष कामगार दिन चिरायू होवो, महाराष्ट्र दिन चिरायू होवो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहीजे, समान कामास समान वेतन मिळालेच पाहिजे, मानधन वाढ कमेटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है. अशा घोषणा देत मोर्चा विश्राम गृहापर्यंत नेण्यात आला. व आपल्या मागण्याचे निवेदन पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांना देण्यात आले.
सदर निवेदनात राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेल्या मानधनात वाढ कमेटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करुन अंगणवाडी महिलांना न्याय द्यावा, काम असेपर्यंत वन कामगारांना कामावर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन रोजंदारी कामगारांना कायम कामगारांचे वेतन द्या, मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी, आशा वर्करला मोबदला देताना एपीएल बिपीएल भेद ठेवण्यात येऊ नये. कोल्हापूरच्या धरतीवर एपीएल महिले करिता मोबदला देण्यात यावा. मदतनिसांना पदोन्नती देतांना प्रभावाची अट रद्द करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.
यावेळी मार्गदर्शनपर भाषणात राजनांदगाव वरुन आलेले गजेंद्र झा म्हणाले, कामगार दिन कामगारांना अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देतो.
नागपूर वरुन आलेले अरुण लाटकर म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ लोकांना बलीदान द्यावे लागले. हे आपणाला विसरुन चालणार नाही. मधुकर भरणे म्हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातून तसेच नागपूर आणि वर्धेवरुन अनेक अंगणवाडी महिला मोर्चात सहभागी झाल्या ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार शोभा बोगावार यांनी मानले. यावेळी जिल्ह्याबाहेरील आशा वर्करची उपस्थिती होती.( नगर प्रतिनिधी)