मुख्यमंत्र्यांच्या भेटीविनाच कार्यकर्ते परतले...!
By admin | Published: November 23, 2015 01:02 AM2015-11-23T01:02:56+5:302015-11-23T01:02:56+5:30
चंद्रपूर जिल्ह्याचे भूमीेपुत्र असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या ...
लोकप्रतिनिधीही भेटीविनाच परत : शेकडो कार्यकर्त्यांचा हिरमोड, नागरिकांचीही उसळली होती गर्दी
खडसंगी : चंद्रपूर जिल्ह्याचे भूमीेपुत्र असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी आगमन झाले होते. याच दरम्यान चिमूर तालुक्यातील तुकूम (मासळ) येथील एका खासगी कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती चिमूर क्रांती नगरीतील कार्यकर्ताना होताच शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तुकूम या गावात दुपारी ३ वाजतापासून गर्दी केली. मात्र मुख्यमंत्री आता येतील, मग येतील, अशी वाट पाहून अंधार झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीविनाच माघारी परतावे लागले. यामुळे अनेक उत्साही कार्यकर्तांचा हिरमोड झाला.
भाजपा-सेना युतीच्या काळात अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विदर्भातील मुख्यमंत्री मिळाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मूल असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर नागरिकांची उत्सुकताही तेवढ्याच प्रमाणात शिगेला पोहोचली. त्यामुळे मुख्यमंत्री चिमूर तालुक्यातील तुकूम (मासळ) या तिनशे लोकसंख्येच्या गावात एका खाजगी कार्यक्रमात येणार असल्याने तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, जिल्हापरिषद, नगर परिषद सदस्य तथा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हारतुरे घेऊन शनिवारी दुपारी ३ वाजतापासून उपस्थित झाले.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते एका इमारतीचे उद्घाटन होणार असल्याने त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह पोलीस विभागाचे मोठे अधिकारी चोख बंदोबस्तासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमात उशिर झाल्याने व त्यांच्या जंगल भ्रमंतीमुळे चिमूर तालुक्यात यायला त्यांना रात्रीचे ९.३० वाजले. मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी दुपारी ३ वाजतापासून आलेल्या कार्यकर्त्यांना रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र जास्तच उशीर होत असल्याने कार्यकर्त्यांना आपल्या मुख्यमंत्र्याचा भेटीविनाच माघारी परतावे लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला. (वार्ताहर)
स्वागताचे हार विसावले पार्र्किंगच्या फलकावर
लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आणलेले हार हातात घेऊन बराच वेळ प्रतीक्षा केली. मात्र मुख्यमंत्री यायला उशीर झाल्याने हातात घेऊन असलेले स्वागताचे हार पार्किंगच्या पफलकावर लटकवून ठेवले आणि ते हार अखेरपर्यंत स्वागतविनाच राहले. तर कार्यकर्त्यांना आणलेले फटाकेही न फोडता तसेच परत न्यावे लागले.
पिण्याच्या पाण्याचाही अभाव
मुख्यमंत्री एका खासगी कार्यक्रमासाठी येत असले तरी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी झाली. मात्र आलेल्या कार्यकर्त्यांना साधे पाणी पिण्याचीही व्यवस्था एका मोठ्या प्रतिष्ठानाच्या मालकाने केली नाही. कार्यकर्ते तर सोडाच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस शिपायांनाही पाणी मिळत नव्हते.