राज्य सरकारच्या विरोधात कामगार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:55 PM2018-08-09T23:55:25+5:302018-08-09T23:56:09+5:30

राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली.

Workers on the road against the state government | राज्य सरकारच्या विरोधात कामगार रस्त्यावर

राज्य सरकारच्या विरोधात कामगार रस्त्यावर

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात जेलभरो आंदोलन : शेकडो महिला व पुरूष कामगारांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य सरकारच्या विविध सरकारी व खासगी कार्यालयात कार्यरत कामगारांनी गुरूवारी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. अखिल भारतीय किसान सभा व सीटूच्या वतीने आयोजित या मोर्चात सहभागी शेकडो कामगारांनी गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर येथे सभा झाली. सभेनंतर शेकडो कामगारांनी जेलभरो आंदोलन करून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
मोर्चाचे नेतृत्व प्रा. रमेशचंद्र दहीवडे, प्रल्हाद वाघमारे, वामन बुटले व प्रमोद गोडघाटे यांनी केले. आंदोलनकर्ते कामगार गांधी चौकातून जिल्हा परिषदेवर धडकले. त्यानंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात कामगारांनी रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले. यात लोकशाही आघाडीचे अंकुश वाघमारे, किशोर पोतनवार, शेख मैकु शहाबुद्दीन, नामदेव कन्नाके, रामसिंह सोहेल, हिराचंद बोरकुटे, प्रा.माधव गुरनुले, अन्वरभाई आलम मिर्झा, अय्युबभाई कच्ची, गोविंद मित्रा, शंकर सोगोरे, पी. एम. जाधव आदींनी जेलभरो आंदोलनाला समर्थन दिला.
या जेलभरो आंदोलनात वनजमिनीवर अतिक्रमण करून जमीन कसत असलेले जबरानज्योत शेतकरी, मलेरिया कामगार, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत वनमजूर, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी महिला-पुरूष, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पोषण आहार शिजवणाऱ्या महिला, ग्रामीण क्षेत्रात कार्यरत आशा वर्कर, खासगी कार्यालयात कार्यरत कंत्राटी  कामगार, संगठित उद्योग कोलमाइन्सचे कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या
जबरानजोत कास्तकारांना जमिनीचे पट्टे द्यावे, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून खर्चावर ५० टक्के नफा असा हमीभाव द्यावा, ६० वर्षावरील सर्व कष्टकऱ्यांना किमान पाच हजार रुपये पेंशन द्यावे, सर्व असंघटीत कामगारांना किमान वेतन १८ हजार रुपये वेतन द्यावे, खाजगीकरणाचा विरोध, ठेकेदारी पद्धती बंद करा, लोकसभा निवडणुकीतील आश्वासनाची अंमलबजावणी करा आदी मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले. 
   गटप्रवर्तक व आशा वर्करचे धरणे 
नागभीड : आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी धरणे आंदोलन करून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान कायमस्वरूपी राबवावे, किमान वेतन १८ हजार तसेच ३ हजार रुपये पेंशन देण्यात यावी, दवाखान्यांचे खाजगीकरण बंद करण्यात यावे, अशा २६ मांगण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात सुनंदा मुलमुले, दुशाली खोब्रागडे, स्मिता कुंभरे, विद्या जांभूळे, हेमलता नाकाडे, सपना खोब्रागडे, दर्शना मेश्राम, कल्पना मेश्राम यांचा समावेश होता.

Web Title: Workers on the road against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.