नऊ महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:31+5:302021-08-27T04:30:31+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील जवळपास दोनशे कामगारांचे मागील नऊ महिन्यांचे वेतन क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकविले आहे. त्यामुळे कामगारांवर ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील जवळपास दोनशे कामगारांचे मागील नऊ महिन्यांचे वेतन क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने थकविले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात कामगारांनी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत कामगारांच्या मुलाबाळांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त अमोल यावलीकर यांच्या कार्यालयात धडक देत निर्वाणीचा इशारा दिला आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासनअंतर्गत विविध इमारतींची स्वच्छता, सुरक्षाव्यवस्था, तसेच बागकाम बाहेरील कंपनीला दिले जाते. येथील साफसफाई व देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपनीला मिळाले आहे. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय इमारती, वसतिगृह, निवासी शाळा आदी ठिकाणी जवळपास दोनशे कामगार मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, डिसेंबर २०२० पासून अद्यापपर्यंत कंपनीने कामगारांचे वेतन थकविले आहे. यासोबतच एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी कंपनीतर्फे जमा करण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे. थकीत वेतनच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ समाजकल्याण विभाग कार्यालयात धडकले. यावेळी सहायक समाजकल्याण आयुक्त अमोल यावलीकर दौऱ्यावर असल्याने त्यांना सचिन भोयर यांनी फोन करून चर्चा केली. एवढेच नाही तर जोपर्यंत कार्यालयात येणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याचे ठणकावले. दरम्यान, सहायक आयुक्त दौरा सोडून कार्यालयात दाखल झाले. यावेळी कंपनीविरुद्ध तक्रार करून सात दिवसांत कामगारांचे वेतन न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मनसे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू बघेल, महिला शहराध्यक्षा प्रतिमा ठाकूर, प्राध्यापक नितीन भोयर, जिल्हा उपाध्यक्ष माया मेश्राम, शोभा वाघमारे, मंगेश चौधरी व कामगार आदी उपस्थित होते.