कामगारांनी पाठविले राज्यपालांना रक्ताने लिहिलेले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:32+5:302021-06-03T04:20:32+5:30
चंद्रपूर : सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील ११५ दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५००च्या ...
चंद्रपूर : सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील ११५ दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५००च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात डेरा आंदोलन सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्या कामगारांनी २ जून रोजी दुपारी राज्यपालांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मागणीकडे लक्ष वेधले.
चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील १२ महिन्यांपासून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नाही. कंत्राटदार नसताना कंत्राटी कामगारांकडून कोरोना आपत्तीमध्ये कामे करवून घेण्यात आली. मात्र, कंत्राटदार नसल्यामुळे कामगारांचे पगार कोणाच्या मार्फत द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कामगारांचा ७ महिन्यांचा पगार थकीत आहे. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ५६२ कंत्राटी पदासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या १२ महिन्यांनंतर नवीन कंत्राटदाराला कामाचा आदेश देताना निविदेतील ३५५ कंत्राटी पदे कोणतेही ठोस कारण नसताना कमी करण्यात आली. ५६२ पदांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २०७ पदांसाठी कंत्राटदाराला काम देण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
त्यामुळे ७ महिन्यांचा थकीत पगार, किमान वेतन व हक्काचा रोजगार या मागण्यांसाठी डेरा आंदोलनातील शेकडो कामगारांच्या रक्ताने पत्र लिहून त्यावर स्वाक्षऱ्या करून राज्यपालांना पत्र पाठवित त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.