बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:34+5:302021-02-07T04:26:34+5:30
मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर ...
मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरड बांधवांकडून होत आहे.
रस्ते, नाल्यांचे बांधकाम अजूनही अर्धवट
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर, इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. दरवर्षी पावसाळ्यातील रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रस्ते व नाल्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
चिमूर : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व विटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.
नव्या कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी
कोरपना : तालुक्यातील कवठाळा व पार्डी येथे कनिष्ठ महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांना गडचांदूर किंवा कोरपना येथे जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे परिसरात कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालये कोरपना येथे आणावी
कोरपना : तालुका वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शाखा अभियंता पकडीगुडम सिंचन प्रकल्प, हिवताप निर्मूलन आरोग्य उपपथक कार्यालये गडचांदूर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदा फाटा येथे आहे. सदर कार्यालय एकाच ठिकाणी कामे होण्यासाठी कोरपना मुख्यालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कोरपना येथे स्थानांतरित करण्याची मागणी केली जात आहे.
दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. मात्र उद्योग परिसरातील गावाचा आजही पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे या उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. तर मूल, सावली, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यात अद्यापही पाहिजे तसे उद्योगच नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी(खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
तुकूम परिसरातील नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. तुकूम परिसरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकांमुळे या योजनेचा बोजवारा उडतांना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी
वरोरा : तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. खरीप हंगामातही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
जांभूळघाट-नवतळा मार्गाची दुरवस्था
चिमूर : तालुक्यातील जांभूळघाट-पिंपळगाव-नवतळा हे आठ किमीचे अंतर आहे. चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडले. बांधकाम विभागाने तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच
सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पंचायत समिती स्तरावर सुधारित आकृती बंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे. पण, पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्या, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
विशेष घटक योजनेतून वीजजोडणी करावी
घुग्घुस : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीजजोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेंतर्गत वीजपुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.