चार महिन्यांपासून मजुरांची मजुरीसाठी पायपीट
By admin | Published: May 30, 2016 01:10 AM2016-05-30T01:10:10+5:302016-05-30T01:10:10+5:30
मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रातील जंगली कामे करणाऱ्या वनमजुरांचे वेतन ...
झरण क्षेत्रातील कामे ठप्प : वनाधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत
कोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्रातील जंगली कामे करणाऱ्या वनमजुरांचे वेतन मागील चार महिन्यांपासून करण्यात आले नाहीत. परिणामी मजुरात असंतोष पसरला असून पगारासाठी वनाधिकारी कार्यालय व वनाधिकाऱ्यांच्या निवासाभोवती मजुर उंबरठे झिजवित आहेत.
झरण वनपरिक्षेत्रात जंगलातील विविध कामे मजुरांकडून केली जातात. त्यासाठी त्यांना रोजंदारी आणि शासकीय नियमानुसार ठरविल्याप्रमाणे मजूरी द्यायची असते. मागील चार महिन्यापासून जंगलात कडक उन्हात अंगमेहनतीची कामे मजुरांकडून सतत करवून घेण्यात आले. गोरगरीब मजुर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगली कामावर जात असतात.
केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळाला तर कुटूंबाची आर्थिक समस्या निकाली निघेल, हिच आशा. मात्र काम करून महिना लोटला तरीही पगार नाही. पगारासाठी वनाधिकाऱ्यांना विचारणा केल्यास अॅडव्हान्स घ्या म्हणून मजुरांच्या हातावर अक्षता ठेवल्या जात असल्याचा प्रकार मागील जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. (वार्ताहर)
झरण क्षेत्राचा कारभार ढेपाळला
जानेवारी २०१६ मध्ये झरणचे वनाधिकारी पुलगमकर निवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन वनाधिकारी रूजू झाले. जुन्या वनाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार न येवू देता सतत तीन वर्षे विनासमस्येने वनक्षेत्राचा कारभार सुरळीत चालविला. मात्र नवीन वनाधिकारी रूजू होताच समस्यांचा डोंगर उंचावला. दर दिवशी निरनिराळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या. झरण क्षेत्रातील वनकर्मचारी व जंगली मजुरांचा भ्रमनिराश झाला व झरण वनक्षेत्राचा कारभार चार महिन्यात ढेपाळला. मात्र त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असून या क्षेत्रातील विविध समस्या व मजूर कर्मचारी उग्र रूप धारण करू लागले आहे.
झरण विक्री आगार अस्थाव्यस्त
झरण वनक्षेत्रात तोडण्यात आलेला लांब बांबू, बांबू बंडल, चापाटी बांबू तसेच इमारती लाकूड, बिट इत्यादी जंगलातून वाहतूक करून विक्री आगारात टाकण्यात आला. सदर वनउपज लिलावापूर्वी विक्री आगारात त्यांची योग्य रचना करणे आवश्यक आहे. मात्र डेपोत काम करणाऱ्या मजुरांचाही पगार न झाल्याने त्यांनी डेपोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. सद्या झरण विक्री आगारात वनउपज विखुरलेला पडून आहे.