कामगारांना किमान वेतन मिळणार
By admin | Published: January 26, 2017 01:38 AM2017-01-26T01:38:53+5:302017-01-26T01:38:53+5:30
कंत्राटदारांनी मनपामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे, यासह इतर २५ मुद्यांचे पालन कंत्राटदारांनी काटेकोरपणे करावे,
मनपा आयुक्तांचे आदेश : २५ निकष पाळण्याची सक्ती
चंद्रपूर : कंत्राटदारांनी मनपामधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे, यासह इतर २५ मुद्यांचे पालन कंत्राटदारांनी काटेकोरपणे करावे, असा आदेश मनपा आयुक्त संजय काकडे यांनी जारी केला आहे. जर कंत्राटदारांनी या नियमाचे पालन केले नाही, तर ठेकदाराला पुढे ठेकेदारी मिळू शकणार नाही. त्यामुळे आता कामगारांना किमान वेतन मिळणार आहे. त्यामुळे कामगारांना सुगीचे दिवस येणार आहेत.
कंत्राटी कामगारांना किमान वेतनासह, कामाचे नियम, कंत्राटदार परवाना, भविष्य निर्वाह निधी कायद्याची अंमलबजावणी, कामगारांचे सात तारखेपर्यंत पगार यासह २५ निकषांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले. यासोबतच सुरक्षारक्षक मंडळाकडे कामगारांच्या नोंदणीसाठी पत्रव्यवहार आयुक्तांनी केला आहे. पूर्वी कंत्राटी कामगारांना तीन ते चार हजार रुपये पगार देण्यात येत होता. मात्र किमान वेतन कायद्याच्या आधारे कामगारांना १४ हजार रुपये प्रतिमाह वेतन मिळणार आहे.
विशेष म्हणजे मनपा हद्दीत कार्यरत कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून संघर्ष सुरु होता. मात्र आता मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिलेल्या आदेशामुळे कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणखी संघटना प्रयत्नरत राहील, अशी प्रतिक्रिया विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष हर्षलकुमार चिपळूणकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. या आदेशामुळे मागील प्रलंबित किमान वेतन संबधित वसुली दाव्यांना गती येणार आहे. तसेच कामगारांना लाभ होत असल्यामुळे विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त संजय काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. (नगर प्रतिनिधी)
हे आहेत निकष
कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे, कामाचे नियम ठराविक असावे, भविष्य निर्वाह निधी कायद्याची अमलबजावणी करावी, नोंदणी दाखल्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे, कंत्राटदारांनी कंत्राटी कामगारांची सेवा घेताना निविदेपूर्वी किमान वेतनाबाबत कामगार कल्याण विभागाचा अभिप्राय घ्यावा, कंत्राटदाराने कामगारांना कामाचे वेतन व त्यावरील इतर भत्ते रोख स्वरुपात अदा न करता संबंधित कामगारांच्या नावाने धनादेशाद्वारे अदा करावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होताना व कार्यालय सोडताना बायोमेट्रिक प्रणालीवर त्याची उपस्थिती दर्शवीणे अनिवार्य राहील, कंत्राटदारांनी सात तारखेच्या आत अदा करावे, मनपाकडून कंत्राटदारास बोनस दिला असेल, तर बोनसची रक्कम संबधीत कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांना अदा करणे आवश्यक राहील, कामगारांच्या खात्यात वेतन देयक जमा केल्याची माहिती प्रतिमहिन्याला संबंधित कार्यालयात सादर करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे राहिल, सदर माहिती सादर न केल्यास त्या महिन्याचे देयक अदा करण्यात येणार नसल्याचे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. कंत्राटी कामगारांना साप्ताहिक रजा द्यावी, त्या दिवसाचे वेतन कापता येणार नाही, यासह आदी निकषाचा समावेश आहे.