जिल्हा कारागृहात बंदी समस्या निवारण, सुधारणा विषयावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:02 AM2017-11-01T01:02:53+5:302017-11-01T01:03:18+5:30
येथील जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी कारागृह अधीक्षक यांनी सोमवारी एका अभिनव उपक्रमाची सुरवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी कारागृह अधीक्षक यांनी सोमवारी एका अभिनव उपक्रमाची सुरवात केली. बंदी समस्या निवारण व सुधारणा, या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या शेवटी ही कार्यशाळा आयोजित केली जाणार असून यातून बंदीवानांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृहाचे अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कारागृह समितीचे सदस्य डॉ. मलक शाकीर, जिल्हा परीविक्षा अधिकारी दडमल, परीविक्षाधीन अधिकारी बोरीकर, कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. वनकर व विदर्भ ग्रामिण विकास मंडळ, चंद्रपूरचे अध्यक्ष अजय साखरकर उपस्थित होते.
या कार्यशाळेत सर्व बंदीवानांना प्रमुख समस्या विचारण्यात आल्या व त्या प्रमुख मार्गदर्शकामार्फत सोडविण्यात आल्या. बंदीवानांना येणाºया सर्व कायदेविषयक समस्यावर डॉ. मलक शाकीर यांनी मार्गदर्शक करीत न्यायिक समस्या त्वरीत सोडविल्या व प्रत्येक बंदीवानांना खटल्याची माहिती सत्र न्यायालयतर्फे आॅनलाईन न्यायालयाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध केली जाते, याबाबत माहिती दिली. बंदीवानांना आरोग्यविषयक समस्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनकर यांच्या मार्फत सोडविण्यात आल्या तर बंद्याच्या पुनर्वसनात्मक समस्या सोडविताना परिविक्षा अधिकारी दडमल यांनी मुक्तबंदी सहाय्य अनुदान या शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याविषयी बंद्याना मार्गदर्शन केले. बंद्याच्या लहान मुलांच्या शैक्षणिक बाबीची समस्या लक्षात घेता परिविक्षा अधिकारी बोरीकर यांनी बाल संगोपन या शासनाच्या योजनेअंतर्गत कारागृहात दाखल असलेल्या गरीब बंद्याच्या पाल्यांना मोफत शिक्षण व मोफत वसतिगृह या योजनेविषयी मार्गदर्शन केले.
कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी कारागृहातील अशिक्षित बंद्याना मिळणाºया शैक्षणिक सुविधा व ग्रंथालयीन सुविधा याविषयी मार्गदर्शन केले. कारागृह अधिक्षक डॉ. बी.एन. ढोले यांनी कारागृहात बंद्याना मिळणारा सकस आहार, मनोरंजन, खेळ, शिक्षण याविषयी मार्गदर्शन करताना कारागृह हे बंदीशाळा नसून ते एक सुधारशाळा असल्याचे प्रतिपादन केले. संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. यशस्वीतेकरिता वैभव आत्राम, सुनिल वानखडे व विठ्ठल पवार, अशोक मोटघरे, राजेंद्र देशमुख ओझा आदींनी सहकार्य केले.