लैंगिक अत्याचार कायद्यावर कार्यशाळा
By admin | Published: March 3, 2017 12:56 AM2017-03-03T00:56:41+5:302017-03-03T00:56:41+5:30
जनता महाविद्यालयातील आंतरिक तक्रार समितीच्या (आयसीसी) वतीने ‘काम करण्याच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार
पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन : महिला व विद्यार्थिनींची जनजागृती
चंद्रपूर : जनता महाविद्यालयातील आंतरिक तक्रार समितीच्या (आयसीसी) वतीने ‘काम करण्याच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा - २०१३’ यावर कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयातील महिला कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिंनीमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयात आयसीसीचे पुर्नगठन करुन महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा - २०१३ च्या निर्देशानुसार नवीन समिती गठित करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. अभय पाचपोर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जुगलकिशोर सोमाणी, डॉ. पृथ्वीराज खिंची, आयसीसी अध्यक्ष डॉ. सरिता तिवारी, सदस्य डॉ. एन.आर. बेग, डी. यू. अडबाले उपस्थित होते.
आयसीसीच्या सदस्या डॉ. नहिदा बेग यांनी लैगिंक अत्याचाराचे प्रकार, परिणाम व लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याविषयी महिला कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आदीबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. अभय पाचपोर यांनी उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांना संवैधानिक अधिकार व या कायद्याची पार्श्वभूमी समजावून सांगत गुन्ह्यातील गंभीरता व कायद्याचे शिक्षणावर प्रकाश टाकला. यावेळी पावर पार्इंट प्रेझेंटेशनमार्फत उपस्थितांना लैंगिक अत्याचाराच्या श्रेणी, उच्च शैक्षणिक संस्थामध्ये कार्यरत महिला कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्यापासून संरक्षण, कायद्यातील तरतुदी, नियम, कायदा - २०१३ व अधिनियम- २०१६ या लैंगिक छळाच्या कायद्याबाबत जागृती व शिक्षकेबाबत माहिती, पीडितांनी घ्यावयाची काळजी विषयावरील विस्तृत माहिती दिली.
चांदा शिक्षण मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या पुढाकारातून कार्यशाळा झाली. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी लावण्यात आली व त्याचे उद्घाटन डॉ. जुगलकिशोर सोमाणी यांचे हस्ते करण्यात आले.
संचालन व आभार डॉ. निलिमा हजारे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता प्रा. आय.एस. कोन्ड्रा, डॉ. कीर्ती वर्मा, प्रा. व्ही. एस. बोढाले, प्रा. मनिषा जेनेकर, प्रा. क्षमा गवई, प्रा. जावेश शेख, प्रा. सारडा तसेच प्रविण वासेकर, अविनाश धांदे, जी. आर. काळे, कालिचरण ढेंगळे, व्रिपा पाटील, शारदा पोडे, वैशाली लोंढे, वैशाली आवळे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)