दूषित पाण्याची समस्या सोडविणार जागतिक बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 12:44 AM2016-09-22T00:44:56+5:302016-09-22T00:44:56+5:30
जिल्ह्यात अनेक गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजाराची लागण होत असून...
चमूची गावांना भेटी : गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजाराची लागण होत असून पाण्याचे दुसरे स्त्रोत उपलब्ध नसल्याने दूषित पाण्यानेच गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. याची दखल घेत जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने अॅरो प्लॅन्टची निर्मीती होणार आहे. यामुळे गावकऱ्यांची फ्लोराईडयुक्त पाण्यापासून मुक्तता होणार आहे.
जागतिक बँकेचे सल्लागार मणी व चारु जैन हे जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्याकरिता व करण्यात येणाऱ्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या भेटीवर आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील खरबी, सिंदेवाही- आलेसूर व चंद्रपूर तालुक्यातील डोणी या गावांना भेटी देवून येथील कामांची पाहणी केली. यावेळी या चमुने जलस्वराज-२ कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या पाणी गुणवत्ता बाधीत व टंचाईग्रस्त गावांनाही भेटी दिल्या. गावकऱ्यांसोबत चर्चा करून गावामधील योजना लोकसहभागावरच चालवाव्या, असे म्हणाले.
या व्यतिरिक्त तेथील परिस्थितीवर तसेच उपाययोजनांवर गावकऱ्यांसोबत तसेच उपस्थित अधिकारी वर्गासोबत चर्चा केली. या भेटीदरम्यान जागतिक बँकेच्या चमूने खरबी व आलेसुर येथील शाळेतील मुलांच्या दातांची तपासणी केली असता, त्यांना दातांच्या फ्लोरोसीनचे रुग्ण आढळून आले. तसेच वयोवृद्धांमध्ये हातापायांवर फ्लोराईडयुक्त पाण्याच दुष्परिणाम आढळून आले. त्यामुळे सदर निवडलेली गावे योग्य आहे, अशी खात्री करून घेतली.
गावामध्ये पाणी गुणवत्ता बाधीत स्त्रोत असल्याकारणाने तलावामध्ये विहिर घेऊन ते पाणी शुद्ध करून ग्रामस्थांना एटीएमद्वारे पाच रुपयांमध्ये १० लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सुचविले. गावकऱ्यांनी याबाबत संमती दर्शविली. त्यानंतर सिंदेवाही मधील आलेसूर या गावामध्ये सुद्धा सर्व पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले.
चंद्रपूर तालुक्यातील डोणी येथे पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणी टाकी घेऊन घरोघरी नळ देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याना सुचना देण्यात आले. जागतिक बँकेच्या चमूने गावकऱ्यांसोबत पाणी गुणवत्तेबाबत चर्चा केली. सर्व गावांची पूर्ण पाहणी करून जलस्वराज-२ कार्यक्रमांमधील सर्व योजना या लोकसहभागावरच आधारीत असून त्या ग्रामस्थांनी आपल्या घरची योजना आहे म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी भेटीदरम्यान भुवैज्ञानिक देशकर, कार्यकारी अभियंता मिलींद चंद्रागडे, वरिष्ठ भुवैज्ञानिक विश्वास वालदे, गट विकास अधिकारी प्रदीप बिरमवार, उपकार्यकारी अभियंता पिपरे उपअभियंता शामकुवर, रोहण बालमवार, समाज व्यवस्थापन तज्ञ माधवी मते, माहिती शिक्षण व संवादतज्ञ प्रविण खंडारे, पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले, भुवैज्ञानिक लांजेवार, पंचायत समिती सदस्य अभय हांडेकर, नेवारे, आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
आलेसूर गाव होणार फ्लोराईडयुक्त
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील आलेसूर येथे फ्लोराईडयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलस्वराज्य योजनेंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने जल शुद्धीकरणाची १७ लाख रुपयाची योजना कार्यान्वीत होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आलेसूर ग्रामपंचायतीच्या चार विहिरी व पाच हातपंप असून ६०० च्या आसपास गावाची लोकसंख्या आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी व हातपंपावर गावकऱ्यांना अवलंबून राहावे लागत असून इतर पाण्याचे स्त्रोत गावात नाहीत. त्यामुळे मागील वर्षी गावामध्ये तापाची व इतर रोगाची साथ पसरली होती. यावर्षी सुद्धा साथीचे आजार पसरले होते. (वार्ताहर)