कौशल्यातून जिंकता येते जग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:05 PM2019-07-15T23:05:11+5:302019-07-15T23:05:32+5:30
अत्याधुनिक शस्त्रांच्या आधारावर युद्धाच्या माध्यमातून जगाला जिंकले शक्य नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला केवळ कौशल्याच्या आधारे जिंकता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याधारित विविध योजना सुरू केल्या आहे.
xलोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अत्याधुनिक शस्त्रांच्या आधारावर युद्धाच्या माध्यमातून जगाला जिंकले शक्य नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला केवळ कौशल्याच्या आधारे जिंकता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याधारित विविध योजना सुरू केल्या आहे. युवकांनी योजनांचा लाभ घेऊन प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सोमवारी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा नियोजन अधिकारी नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भय्याजी येरमे, उद्योजकता विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, १७५० मध्ये जगाच्या एकूण उत्पन्नापैकी एकट्या भारताचे उत्पन्न ५० टक्के होते. परंतु आज गरजेच्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात. युवकांना स्वत:चे कौशल्य ओळखता आले नाही. आजही देश निर्मिती व निर्यातीमध्ये मागे आहे. युवकांमध्ये शक्ती आहे. परंतु त्या शक्तीला कौशल्याची जोड देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील युवकांनी योजनांचा लाभ घेऊन कौशल्य निर्माण करावे, स्वत:सोबत देशाचाही विकास साधावा, असेही त्यांनी नमुद केले. युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती व टूथपिक निर्मितीचा उद्योग व सैनिकी शाळेची उभारणी केली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक बाबींसाठी केल्यास सहजपणे यश मिळविता येते. जग अथवा देश बदलाची वाट न पाहता बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याची आज खरी गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित विद्यार्थी व युवक, युवतींना दिल्या.
नोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. आपल्या देशात २०१५ पासून हा दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रशासकीय भवन ते प्रियदर्शनी सभागृहापर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. उपरवाही येथील स्किल अन्ड इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट व ब्रह्मपुरी येथील एकलव्य भटक्या मागासवर्गीय संस्थेने पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे युवांमध्ये जनजागृती केली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे, नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. बल्लारपूर येथील डायमंड कटींग सेन्टरच्या माध्यमातून हिऱ्याला पैलू पाडणाºया कौशल्य विकासाचे प्रात्याक्षिकही युवकांनी अनुभवले. केंद्र संचालक निलेश गुल्हाने यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी उपस्थित होते.
भविष्याचा लष्करप्रमुख जिल्ह्यातूनही होऊ शकतो
राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना युवकांमध्ये कौशल्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योजकता निर्माण होण्याकरिता निधीची तरतूद केली आहे. पोंभूर्णा येथे अगरबत्ती व टूथपिक निर्मितीचा उद्योग सुरू करण्यात आला. जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू झाली. यातून भविष्यात राष्ट्राचा लष्करप्रमुख या शाळेतून शिकलेला असेल तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून येईल, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही
जिल्ह्यात वनसंपत्ती, खनिज संपत्ती व कृषी संपत्तीची नव्हे तर त्यावर आधारित उद्योगांची कमतरता आहे. हे ओळखूनच चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. बांबूवर आधारित उद्योग करणाºया महिला युवकांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होणार आहे. उत्पादनाच्या क्लस्टर पद्धतीचा शोध भारतातच लागल्याने त्याचे महत्त्व तरुणांनी ओळखावे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची अजिबात कमतरता नाही. त्यामुळे युवकांनी निराश न होता योजनांचा लाभ घेऊन जीवनाच्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.