जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन ऑक्टोबरमध्ये होणार खुले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:00+5:302021-08-01T04:26:00+5:30
फुलपाखरू उद्यान, ग्लास हाऊस, बोन्साय गार्डन व २८,४०० विविध प्रजातींची झाडे आकर्षणाचे केंद्र सुभाष भटवलकर विसापूर : संत तुकाराम ...
फुलपाखरू उद्यान, ग्लास हाऊस, बोन्साय गार्डन व २८,४०० विविध प्रजातींची झाडे आकर्षणाचे केंद्र
सुभाष भटवलकर
विसापूर : संत तुकाराम महाराज यांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" या अभंगाचा प्रत्यक्ष प्रत्यय आणून देणारी वनश्री विसापूर येथे बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून लवकरच सर्व नागरिकांना बघायला मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे जागतिक दर्जाच्या भव्य बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आलेली होती. ते काम पूर्णत्वास आल्याने, हे गार्डन ऑक्टोबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे वन विभागाने ठरवले आहे. विद्यार्थी, निसर्गप्रेमी, फुलपाखरू निरीक्षक, वनस्पती संशोधक, पर्यटक व अन्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्र हे निसर्ग वन आणि जैवविविधतेने संपन्न आणि समृद्ध निसर्ग वैभवाने नटलेले आहे. नेमकी ही बाब हेरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून हा प्रकल्प युती शासनाच्या काळात १६ जून २०१५ ला मंजूर करून घेतला.
बॉक्स
ही आहेत गार्डनची वैशिष्ट्ये
या गार्डनच्या निर्मितीसाठी १३१.४४ कोटी निधी शासनाकडून खर्च करण्यात आला आहे. उर्वरित काम व देखभालीसाठी २६.६२ कोटी निधीची आवश्यकता आहे. हे गार्डन १०८ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले असून, त्यामध्ये कंझर्वेशन झोन ९४ हेक्टर व रिक्रिएशन झोन १४ हेक्टरचा समावेश आहे. कंझर्वेशन झोनमध्ये १३० वेगवेगळ्या प्रजातींची २८,४०० झाडे लावण्यात आलेली आहेत. त्यांची उत्तम वाढ झालेली आहे. या झोनमध्ये खुले फुलपाखरू उद्यान, पामेटम, बोन्साय गार्डन, बोगनवेलिया गार्डन, विविध जलमृद संधारणाची कामे जलाशय ट्री हाऊस यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच रिक्रिएशन झोनमध्ये भूमिकेत संग्रहालय, बंदिस्त फुलपाखरू उद्यान, विज्ञान केंद्र, कॅफेटेरिया, उत्क्रांती पार्क, ग्लास हाऊस, बीज संग्रहालय प्रकल्पाचा समावेश आहे.
बॉक्स
पर्यटकांची वर्दळ वाढणार
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. अशातच देशातील जागतिक दर्जाच्या आधुनिक बॉटनिकल गार्डन व संरक्षण खात्यांतर्गत येणारी नवीन सैनिक शाळा व संग्रहालय जवळ असल्याने येथे पर्यटकांची वर्दळ निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर विकासाचे हब म्हणून उदयास येईल.
कोट
बॉटनिकल गार्डनमध्ये स्थानिक होतकरू युवकांना वनविभागाने गाईडचे प्रशिक्षण देऊन रोजगार द्यावा. तसेच विसापूर गावातील व्यावसायिकांना या परिसरात व्यवसाय सुरू करण्याची अनुमती देण्यात यावी आणि गार्डनच्या देखभालीच्या कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे.
-वर्षा कुडमेथे, सरपंच, ग्रामपंचायत विसापूर
कोट:
अस्तित्वात असलेल्या जैविक साठा व वन, वनेतर दुर्मीळ व धोक्यात आलेले वनस्पतीचे जतन करणे या गार्डनच्या माध्यमातून हे शक्य होईल. तसेच विद्यार्थी, पर्यटक यांच्यामध्ये निसर्गाप्रति व विज्ञानाप्रति अभिरुची निर्माण होईल.
-अ. द. मुंढे, उपवनसंरक्षक, मध्य वन विभाग चंद्रपूर.