अश्वांच्या पाठीवर फिरतो मेंढपाळांचा संसार
By admin | Published: January 15, 2015 10:48 PM2015-01-15T22:48:03+5:302015-01-15T22:48:03+5:30
९०० मेंढ्या, २५ अश्व आणि २० कुटुंब हा काफीला आहे, त्या मेंढपाळांचा ज्यांच्या नशिबी आयुष्यभर भटकंतीच आली आहे. हा व्यवसाय पारंपारीक व्यवसाय म्हणून जरी त्यांनी स्वीकारला असला तरी
संरक्षणासाठी श्वान : विकास योजनांपासून दूर
सचिन सरपटवार - भद्रावती
९०० मेंढ्या, २५ अश्व आणि २० कुटुंब हा काफीला आहे, त्या मेंढपाळांचा ज्यांच्या नशिबी आयुष्यभर भटकंतीच आली आहे. हा व्यवसाय पारंपारीक व्यवसाय म्हणून जरी त्यांनी स्वीकारला असला तरी या व्यवसायातून त्यांची सर्वांगीण प्रगती झाल्याचे दिसुन येत नाही. भटकंतीमुळे त्यांची लेकरं शिक्षणाच्या प्रवाहापासुन वंचीत राहिली. स्वातंत्र्य मिळून आज ६८ वर्षे झालीत, पण ही जमात अजुनही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेली नाही.
मंगळवारच्या दुपारी भद्रावती ते तेलवासा रस्त्यावर अगदी शिस्तप्रिय चालत असलेले २५ घोडे दिसून आले. घोड्यांसोबत त्यांचे मालक असलेले मेंढपाळही होते. या मेंढपाळांनी आपल्या भटकंती आयुष्याची माहिती ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. या भटकंतीला त्यांनी गेल्या दसऱ्यापासुन सुरूवात केली आहे. सावरगाव जि. यवतमाळ येथील हे रहिवाशी आहेत. खताच्या दृष्टीने त्यांच्या मालकीच्या मेंढ्या शेतांमध्ये बसवणे व मागणी झाल्यास त्या मेंढ्या विकणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. जिथे मागणी होईल, तिथे थांबणे व त्याच ठिकाणी आपला संसार उभार करणे, हा त्यांचा नित्य नियम. या ठिकाणाहुन त्या ठिकाणापर्यंत त्यांचा हा संसार अश्वांच्या पाठीवर वाहून नेल्या जात आहे. या घोड्यांच्या पाठीवर ‘पडसी’ टाकण्यात आली असून पडसीच्या दोन्ही बाजुने जिवनावश्यक साहित्य ठेवण्यात आले आहे. संसाराला उपयुक्त असे स्वयंपाकाचे भांडे, जाळायला लहान लाकडं, अन्नधान्य तसेच पाण्याचे जार सुद्धा यात ठेवण्यात आले आहे. यासोबत कोंबड्या, बकरीचे पिल्लू सुद्धा यांचे सोबती आहेत. दोन वर्षाच्या मुलापासून ७५ वर्षांच्या आजी-आजोबा जीवनाच्या या प्रवासात सहभागी झाले आहेत. या सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सात ते आठ श्वानही त्यांच्या सोबत आहेत. ना थंडीची तमा, ना वन्यप्राण्यांची भिती, हे सगळं काही आहे, ते फक्त पोटासाठी असेही ते सांगतात.