लेखक, कलावंतांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:24 AM2021-07-25T04:24:01+5:302021-07-25T04:24:01+5:30
चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ ...
चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ भोवतालात लेखक, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा आणि प्रचलित पायवाटा नाकारून पुन्हा ताकदीने लेखन करावे, असे आवाहन नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
ज्येष्ठ लेखिका तथा समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपुरातील तिरूमल्ला सभागृहात शुक्रवारी वाङ्मयीन पुरस्कार करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, पुरस्कार विजेत्या अरुण सबाने, शर्वरी पेठकर, डॉ. माधवी भट, डॉ. पद्मरेखा धनकर उपस्थित होते.
डॉ. गिरीश गांधी म्हणाले, लेखिका व समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या लेखनाची उंची मोठी आहे. त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा नव्या पिढीला दिशादर्शक आहे. स्व. जयाताईंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात अपार कृतज्ञतेची भावना आहे. ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्यासारख्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वासोबत समांतर पण परस्परपूरक राहून उंची गाठणारी अशी जोडपी आज कमी होत आहेत. आयटीपासून तर विविध क्षेत्रांत मुले-मुली पुढे जाताना दिसतात. मात्र, संयम सुटून विवाह तुटण्याच्या घटना आपण पाहतो आहोत. त्यामुळे या दोघांचा जीवन प्रवास अभ्यासण्यासारखा आहे, याकडे लक्ष वेधून डॉ. गांधी यांनी आशयसंपन्न लेखन करणाऱ्या चारही पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक भाषणातून पुरस्कार विजेत्यांच्या ग्रंथांची सामर्थ्यस्थळे विशद केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी डॉ. शरद सालफडे व बाळ कुलकर्णी यांना शाल देऊन सत्कार केला. संचालन डॉ. सविता भट यांनी केले. नगरसेवक नंदू नागरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागपूर, वर्धा व चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी सहकार्य केले.
असे आहेत पुरस्कार विजेते
शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी, नाट्य लेखन व अनुवादासाठी डॉ. माधवी भट, कवितांसाठी डॉ. पद्मरेखा धनकर आणि वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांना वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते डॉ. जया द्वादशीवार वाङ्मयीन पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली, या शब्दात विजेत्या लेखिकांनी मनोगत व्यक्त केले. पत्नीच्या स्मृतीनिमित्त कुणाचीही मदत न घेता स्वत:च पुरस्कार देण्याची घटना फार दुर्मीळ असून द्वादशीवार ही एक संस्थाच आहे, असा गौरव डॉ. गांधी यांनी केला.