आजपासून महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:04+5:302021-05-10T04:28:04+5:30
बल्लारपूर : सोमवारी महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४५० च्या जवळपास महसूल कर्मचारी १२ ...
बल्लारपूर : सोमवारी महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४५० च्या जवळपास महसूल कर्मचारी १२ मेपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजय मेकलवार यांनी सांगितले आहे.
महसूल कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन ६ तारखेपासून बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसंदर्भात असून, दोन दिवस या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात काळ्या फिती लावून काम केले. सोमवारपासून ३ दिवस लेखणीबंद आंदोलन करणार आहेत. दिवसभर जिल्ह्यातील कोणत्याही तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांची लेखणी चालणार नाही. तसेच १० मे रोजी नागपूर विभागीय आयुक्तांना संघटनेचे विभागीय अध्यक्ष व नागपूर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिष्टमंडळासह भेटून चर्चा करणार आहेत. उपविभागीय अधिकारी डव्हळे यांनी गोंडपिपरी येथील महसूल साहाय्यक सुनील चांदेवार यांच्यावर केलेल्या कारवाईचे पडसाद विदर्भातील महसूल कर्मचारी संघटनांमध्ये उमटले असून, त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होणार आहे. मात्र या आंदोलनाची चर्चा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर रंगू लागली आहे.