वेकोलिची सुरक्षा एजन्सी निविदेविनाच
By admin | Published: June 8, 2016 12:43 AM2016-06-08T00:43:10+5:302016-06-08T00:43:10+5:30
वेकोलि वणी क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे बेकायदेशीररित्या नियमबाह्य खाजगी सुरक्षा (सिक्युरिटी) एजन्सीचे सुरक्षा कर्मचारी सुरक्षा व्यवस्था सांभाळत असल्याची ...
सात दिवस लोटूनही टेंडर नाही : वेकोलिचे बेजबाबदार धोरण
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे बेकायदेशीररित्या नियमबाह्य खाजगी सुरक्षा (सिक्युरिटी) एजन्सीचे सुरक्षा कर्मचारी सुरक्षा व्यवस्था सांभाळत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यावरून वेकोलिचे अधिकारी खाणीच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहेत, हेखील स्पष्ट झाले आहे.
वेकोलि वणी क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून वेकोलिच्या सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत खासगी सुरक्षा एजन्सी सांभाळत आहे. वणी क्षेत्रात खासगी एजन्सीमार्फत २४० सुरक्षा कर्मचारी विविध खाणीत कार्यरत आहेत. त्यांपैकी ४० कर्मचारी पैनगंगा कोळसा खाणीत तर उर्वरित सुरक्षा कर्मचारी उर्जाग्रामच्या क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक कार्यालय, घुग्घुस, नायगाव, निलजई, उकणी, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण क्षेत्रात सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहेत. या विभागात वेकोलिच्या सुमारे १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. वेकोलितील सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करूनसुद्धा पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जात नाही.
दरवर्षी खासगी सुरक्षा एजन्सीसाठी निविदा वेकोलिकडून काढली जाते. पैनगंगा कोळसा खाणीचा मागील वर्षीच्या सुरक्षा एजंसीचा करार ३० मे रोजी संपला. त्या क्षेत्रात ४० सुरक्षा कर्मचारी खासगी सुरक्षा एजन्सी असल्याचे कळते, तर उर्वरित क्षेत्राचा कार्यकाळ ६ जूनला संपला. निविदा संपण्यापूर्वीच वेकोलिने आवश्यक ती कारवाई करण्याची गरज होती. मात्र ती न केल्याने क्षेत्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि कालबाह्य झालेल्या एजन्सीच्या नियमबाह्य कर्मचाऱ्यांवर पुढील व्यवस्था होईपर्यंत सुरक्षेची जबाबदारी सोपविण्याची वेळ आली. सुरक्षा व्यवस्थेसारख्या गंभीर विषयाबाबत वेकोलिच्या अधिकाऱ्यांचे बेजबाबदार धोरण चर्चेचा विषय ठरले आहे. याबाबत वेकोलिच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. तर वेकोलि वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव दास खाजगी कामकाजासाठी रजेवर असून विदेशात असल्याचे कळले. (वार्ताहर)