यावर्षी ३१ पानफळ्यांवर तेंदूपत्ता संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:59+5:302021-05-22T04:26:59+5:30
घनश्याम नवघडे फोटो नागभीड : नागभीड तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामास सुरूवात झाली आहे. नागभीड वनपरिक्षेत्रात यावर्षी ३१ पानफळ्यांवर तेंदूपत्त्याचे ...
घनश्याम नवघडे
फोटो
नागभीड : नागभीड तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामास सुरूवात झाली आहे. नागभीड वनपरिक्षेत्रात यावर्षी ३१ पानफळ्यांवर तेंदूपत्त्याचे संकलन करण्यात येत आहे.
नागभीड तालुका जंगल व्याप्त आहे. नागभीड तालुक्यातील अनेक गावांच्या रोजीरोटीचा प्रश्न जंगलावर अवलंबून आहे. नागभीड तालुक्यातील मुख्य पीक धानाचे असले आणि या पिकावरच या तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून असली तरी या शेती सोबतच या तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मोहफुले वेचणे, मध, डिंक व रानमेवा गोळा करणे, तेंदूपत्ता संकलनाचे काम करणे यासारखी कामे करीत असतात. यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वाधिक लाभकारक आहे. तेंदूपत्ता संकलनाचे हे काम जवळपास एक महिना चालते. अगदी पहाटे जंगलात जाऊन पाने आणणे आणि दुपारपर्यंत घरी आल्यानंतर त्यांचे ‘मुळके’ तयार करून संध्याकाळच्या वेळेस ते पानफळीवर विक्रीसाठी नेणे असे हे काम आहे. या कामात घरातील सर्वच सदस्यांचा हातभार लागत असतो. तेंदूपत्ता संकलनाच्या महिनाभराच्या मिळकतीत कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर येण्यास मोठा हातभार लागत असतो. यावर्षी नागभीड वनपरिक्षेत्रात चार युनिट असून ३१ पानफळ्यांवर तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यात जनकापूर, कोदेपार, गोवारपेठ, नवेगाव हुंडेश्वरी, कोसंबी गवळी, मिंडाळा, बागलमेंढा, कानपा, कोथुळणा, बिकली, पाहार्णी, इरव्हा टेकरी, ढोरपा, मौशी, पान्होळी, बालापूर, म्हसली, विलम, तेलीमेंढा, कोटगाव, मांगली, मोहाळी मोकासा, किरमिटी मेंढा, रानपरसोडी आणि बाम्हणी या गावांचा यात समावेश आहे.
अभयारण्याचा या गावांना फटका
नागभीड वनपरिक्षेत्रातील नवखळा, कुनघाडा चक, कोरंबी, पेंढरी, चिचोली, कसर्ला, डोंगरगाव, चिंधी चक, किटाळी बोरमाळा, हुमा, घोडाझरी व चिंधी माल ही गावे घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रात आल्यामुळे या गावातील पानफळी केंद्र बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी या गावातील नागरिकांना तेंदूपत्ता संकलनाच्या रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. या गावातील नागरिक तेंदूपत्ता संकलनाकडे ‘जोड व्यवसाय’ म्हणून पाहत होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर आणण्यासाठी तेेंदूपत्ता हंगाम या गावांसाठी मोठा आधार होता. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातील या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाला मनाई करण्यात आली. त्यामुळे रोजगाराचा फार मोठा प्रश्न या गावातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. तळोधी वनपरिक्षेत्रात ही काही गावात हीच स्थिती आहे.