शेणखताच्या दरात यावर्षी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:44 AM2019-06-20T00:44:06+5:302019-06-20T00:44:28+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. काही ठिकाणी धुळपेरणीही झाली आहे. तर काही ठिकाणी हंगामपूर्व मशागतीची कामे अंतीम टप्प्यात आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. काही ठिकाणी धुळपेरणीही झाली आहे. तर काही ठिकाणी हंगामपूर्व मशागतीची कामे अंतीम टप्प्यात आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामामध्ये अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले नाही. रबीच्या हंगामातही फटका बसला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयातून नाराजी व्यक्त होत आहे. शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी शेणखताचा उपयोग करतात. मात्र यंदा शेणखताच्या दरात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी एक ट्रॅक्टर शेणखतासाठी शेतकºयांना अडीच हजार रुपये मोजावे लागत होते. परंतु यावर्षी शेणखताचे दर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. दिवसेंदिवस शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय कमी आहे. ज्याच्याकडे जनावरे आहेत ते शेतकरी शेणखत टाकत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे काही शेतकरी आपले पशुधन विक्री करीत आहेत. परिणामी पशुधन संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखताच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करीत आहे. तर मशागतीसाठी शेणखतही शेतात टाकण्याचे काम जोरास सुरु आहे.
सेंद्रीय खतांचे हे आहेत फायदे
सेंद्रीय खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते. जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो. रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखतामधून अन्नद्रव्यांच प्रमाण अत्यल्प असते, परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होतो. जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यात येणाºया संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.
शेती साहित्य निर्मितीची लगबग
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कारागीर शेतीपयोगी साहित्य करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे जिल्हाभरात खरीप हंगामपूर्व शेती मशागतीच्या कामात गती आली आहे. शिवाय अनेक शेतकरी शेतीपयोगी साहित्य तयार करण्यासाठी कारागिरांच्या घरी जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेतीची अनेक कामे पूर्ण होत असली तरी ग्रामीण भागात परंपरागत शेती अवजारांचा वापर शेतीसाठी करण्यात येतो. लोखंडाला आकार देवून त्यापासून शेतीपयोगी साहित्य बनविण्याच्या कामाला लोहार समाजाचे कारागिर लागले आहेत. तसेच काही कारागिर नांगर, वखर व इतर लाकडी साहित्य बनवित आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे खतांची दरवाढ
पशुधन संख्या जास्त असली तरीही यंदा पाणी चारा टंचाईमुळे अनेक पशुपालक आपले पशुधन विक्री करीत आहेत. त्यामुळे पशुधनाची संख्या कमी होत आहे. परिणामी शेणखताच्या दरात वाढ झाली.