अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, या वर्षीही परिस्थिती तशीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:51+5:302021-06-11T04:19:51+5:30

चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने ...

The year of poor students who went without study, the situation is the same this year | अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, या वर्षीही परिस्थिती तशीच

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, या वर्षीही परिस्थिती तशीच

Next

चंद्रपूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. मागील तसेच या वर्षीही ती राबविण्यात आली आहे. मात्र मागील वर्षी वर्षभर शाळाच झाली नसल्यामुळे अभ्यासाविना विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. दरम्यान, या वर्षीही सोडत काढण्यात आली असून शुक्रवार, ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र कोरोना संकटामुळे हे वर्षही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १९६ शाळांनी यासाठी नोंदणी केली. यामध्ये १ हजार ५७१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या वर्षी जिल्ह्यात ३ हजार ८२ विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला असून, १ हजार ४५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, ११ जूनपासून या विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी पुढील २० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरटीई पोर्टलवर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा दिनांक कळविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करायचा आहे.

निवड तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी मागील वर्षीसारखीच स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्षसुद्धा घरीच जाते की काय? अशी चिंता पालकांना सतावत आहे.

बाॅक्स

आरटीई अंतर्गत शाळांची नोंदणी - १९६

किती अर्ज आले - ३,०८२

किती जणांना प्रवेश - १,४५१

बाॅक्स

मागील वर्ष वाया गेले

कोट

गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र कोरोनाने घात केला. वर्षभर शाळाच झाली नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र साधनांचा अभाव असल्यामुळे ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

- महेंद्र खोब्रागडे,

चंद्रपूर

-

माझ्या मुलाला मागील वर्षी प्रवेश मिळाला. मात्र शाळा सुरूच झाली नाही. परिणामी, प्रवेश मिळूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याचे पूर्ण वर्ष वाया गेले. आता पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे पुढील वर्षही वाया जाण्याची शक्यता आहे.

- संजय बल्की,

चंद्रपूर

------

आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आला असला तरी काही शाळा संचालक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विविध स्वरूपात पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतात. तक्रार केली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे शिक्षण विभागाने अशा शाळांवर नजर ठेवायला हवी. जेणेकरून गरिबांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

- एक पालक,

चंद्रपूर

बाॅक्स

गरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत

मागील वर्षभरापासून प्राथमिकचे विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. या वर्षीही शाळा सुरू होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल, लॅपटॉप अशी साधने पुरवावीत, जेणेकरून त्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाइन अभ्यास करणे शक्य होईल. यासंदर्भात राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश चहारे यांनी सांगितले.

कोट

ज्या बालकांना लाॅटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायाचित्र घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. पालकांनी शाळांमध्ये गर्दी करू नये. कोरोना संकटामुळे शासन निर्देशानुसारच पुढील सत्र सुरू होईल.

- दीपेंद्र लोखंडे

शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: The year of poor students who went without study, the situation is the same this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.