यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:14+5:302021-06-01T04:21:14+5:30

चंद्रपूर : दहावी तसेच बारीवीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात टर्निंग पाॅईंट असते. मात्र मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ...

This year the result of all the schools is one hundred percent | यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

यंदा सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

Next

चंद्रपूर : दहावी तसेच बारीवीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात टर्निंग पाॅईंट असते. मात्र मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच दहावीची परीक्षा न घेताच नववी आणि दहावीच्या गुणांद्वारे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक शाळांचे निकाल शंभर टक्के लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हुशार विद्यार्थ्यांचे या पद्धतीमुळे नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट आले. त्यानंतर दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला; तर नववीपर्यंतच्या अनेक शाळांच्या परीक्षासुद्धा झाल्या नाही. दरम्यान, विद्यार्थी पुढील वर्गात पोहोचले. मात्र वर्षभरापासून कोरोना संकट कायम असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबविण्यात आला. याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला; मात्र ग्रामीण भागात नेटवर्क तसेच मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, यावर्षीही कोरोना संकटामुळे दहावीची परीक्षाच झाली नाही. त्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेत मूल्यमापनाचे धोरण जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

बाॅक्स

दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात नोंदणी केलेले विद्यार्थी

मूले-

मुली-

बाॅक्स

असे आहे नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के गुण वापरून दहावीचा निकाल जाहीर करायचा आहे. ही जबाबदारी शाळांवर आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना, विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांच्याआधारे २० गुण दिले जातील.

बाॅक्स

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात.....

राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी शाळांवर सोपविली आहे. त्यातच नवव्या वर्गातील ५० टक्के तसेच दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के गुण वापरून हा निकाल घोषित करायचा आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यी मागीलवर्षी कोरोनाच्या दहशतीमुळे शाळेतच आले नाहीत. अशावेळी त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गुण देताना अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- प्राचार्य नरेंद्र बोबडे, चंद्रपूर

कोट

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नवव्या वर्गाच्या गुणांद्वारे तसेच अंतर्गत मूल्यमापन वापरून गुण द्यायचे आहेत. शाळांमध्ये समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना गुण द्यायचे असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- प्राचार्य हरिहर भांडवलकर, चंद्रपूर

- पालक काय म्हणतात.....

विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या गुणांद्वारे मूल्यमापन करून गुण द्यायचे असले, तरी हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. जर परीक्षा झाली असती, तर चित्र वेगळे असते. शिक्षण विभागाने याआधारे विद्यार्थ्यांना गुण न घेता परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासूनच निकाल लावायचा हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास अधिक वाढेल.

- रोहित प्रसाद, पालक, चंद्रपूर

कोट

मागीलवर्षी नवव्या वर्गाच्या परीक्षा न घेताच निकाल लावण्यात आला. त्यातच आता दहावीची परीक्षासुद्धा घेण्यात आली नाही. सतत दोन वर्षांपासून विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे. त्यामुळे भविष्यात याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड कमी होत आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने घ्या; पण परीक्षा घ्यायलाच पाहिजे होत्या. यातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता लक्षात येऊ शकेल.

- सुरेश मडावी, चंद्रपूर

कोट

विद्यार्थी खूश

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेचा तिढा सुटला आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे, तर काही विद्यार्थ्यांना हा निर्णय आवडलेला नाही. जे विद्यार्थी मुळातच अभ्यासाबाबात गंभीर नाहीत, त्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे आनंद झाला आहे. मात्र जे विद्यार्थी शिक्षणाविषयी गंभीर आणि ज्यांना भविष्याची काळजी आहे, अशा विद्यार्थ्यांमध्ये मात्र या निर्णयावरून संतापाचे वातावरण आहे. पास व्हायचेच होते, तर वर्षभर कशाला मेहनत केली असती, असा प्रश्न आता विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे भविष्यात कुठे नंबर लागायचा असल्यास या गुणांच्या भरवशावर कसा नंबर लागेल, यावरूनही ते चिंतेत असल्याचे दिसून येत आहेत.

बाॅक्स

पुढील प्रवेशाचे काय?

दहावीचा तिढा सुटल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील परीक्षेचा चिंता सतावत आहे. मात्र हा प्रवेश कसा घ्यायचा, हा प्रश्नही त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना पुढील वर्गात प्र‌वेश घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकाल समाधानकारक वाटणार नाही, त्या विद्यार्थ्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी किती दिवस लागतील, यावरही आता विद्यार्थ्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.

Web Title: This year the result of all the schools is one hundred percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.