यंदा पावसाळ्यात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:51 AM2018-07-02T11:51:59+5:302018-07-02T11:52:25+5:30
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. यावर्षी प्रथमताच ताडोब्यात संपूर्ण पर्यटनबंदी घालण्यात आली असून १ आॅक्टोबरपासून ताडोबासाठी आॅनलाईन बुकींग सुरु होणार आहे.
जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक ताडोबामध्ये जंगल सफारीसाठी मोठी गर्दी करतात. दरवर्षी पावसाळ्यात देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्यात येत होते. मात्र ताडोबा याला अपवाद होते. परंतु, यावर्षी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने पावसाळी पर्यटन बंद करण्याचे निर्देश दिल्याने १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
मागील काही वर्षांपासून ताडोबातील प्रवेश आॅनलाईन करण्यात आले आहेत. यामुळे देशभरातील शेकडो पर्यटकांनी कित्येक दिवसांपूर्वीच ताडोबातील पावसाळी पर्यटनासाठी बुकींग केली होती.
याशिवाय ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेकांनी ताडोबाच्या आसपास रिसॉर्ट उभारले आहेत. मात्र पावसाळ्यातील तीन महिने ताडोबा पूर्ण बंदचा निर्णय झाल्याने रिसॉर्ट मालकांना फटका बसणार आहे.
यावर्षी राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार होते. अधिवेशनाला येणारे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी व्याघ्र दर्शनासाठी ताडोबाला येतात, असा आजवरचा अनुभव आहे. आता त्यांचाही हिरमोड होणार आहे.