होय ! जिल्ह्यासाठी नागभीड हेच योग्य स्थान आहे

By admin | Published: January 14, 2016 01:46 AM2016-01-14T01:46:48+5:302016-01-14T01:46:48+5:30

जिल्हा निर्मितीच्या चर्चांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून आमचेच गाव जिल्ह्यासाठी कसे योग्य आहे. हे पटवून देण्याचा खटाटोपही केला जात आहे.

Yes! Nagbhid is the right place for the district | होय ! जिल्ह्यासाठी नागभीड हेच योग्य स्थान आहे

होय ! जिल्ह्यासाठी नागभीड हेच योग्य स्थान आहे

Next

सर्वेक्षण करुनच शासनाने निर्णय घ्यावा : रेल्वे व राज्य मार्गाची उपलब्धी
घनश्याम नवघडे नागभीड
जिल्हा निर्मितीच्या चर्चांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून आमचेच गाव जिल्ह्यासाठी कसे योग्य आहे. हे पटवून देण्याचा खटाटोपही केला जात आहे. पण भौगोलिकदृष्टया विचार करता चिमूर आणि ब्रह्मपुरीपेक्षा नागभीड हेच शहर जिल्ह्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे हे कोणीही नाकारता येणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन एक नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी फार जुनी मागणी आहे. ही मागणी प्रशासकीयदृष्टया योग्यसुद्धा आहे. कारण ब्रह्मपुरी नागभीडपासून मुख्यालय असलेल्या चंद्रपूरचे अंतर १२५ ते १०० कि.मी.च्या घरात आहे. चिमूरचेही असेच आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कामासाठी गेलेला एखादा व्यक्ती त्याच दिवशी काम पूर्ण करुन परत आला, असे कधी होत नाही. याच आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून नवीन जिल्ह्याची मागणी अनेकदा होत असते.
नविन जिल्ह्याची मागणी होत असताना ब्रह्मपुरीकर आणि चिमूरकर आपले घोडे नेहमीच पुढे दामटत असतात. त्यांचे शहर म्हणून त्यांच्यासाठी त्यांची ही मागणी योग्यही आहे. ब्रह्मपुरी व्यापारी नगरी आहे. विद्येचे व वैद्यकीय सेवेचे माहेरघर आहे. तर चिमूर क्रांतीभूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात चिमूरचे भरीव योगदान आहे. पण या गोष्टींची उपलब्धी असली म्हणून त्या जिल्हा निर्मितीसाठी समर्थनीय ठरु शकत नाही. जिल्ह्यासाठी त्या शहराचे भौगोलिक स्थळ, दळणवळणाच्या सोयी आणि कार्यालयासाठी जागेची उपलब्धता या महत्त्वाच्या बाबी आवश्यक असतात. आणि त्या नागभीडमध्ये आहेत. आणि म्हणूनच जिल्ह्यासाठी नागभीड हेच योग्य आहे. असा दावा केल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
तालुक्याच्याच दृष्टीने विचार केल्यास नागभीड हे ब्रह्मपुरी, चिमूर आणि सिंदेवाही या तिन्ही तालुक्यांना अतिशय मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून ब्रह्मपुरी २० कि.मी., चिमूर ३५ किमी आणि सिंदेवाही ४० किमीवर आहे. उलट ब्रह्मपुरी हे शहर चिमूर आणि सिंदेवाहीस अतिशय गैरसोयीचे आहे. तर चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाहीस गैरसोयीचे आहे. नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. येथून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे जाण्यासाठी राज्यमहामार्ग असून या पाचही जिल्ह्याचे अंतर जवळपास १०० कि.मीच्या घरात आहे. कार्यालयीन जागेचीसुद्धा येथे वानवा नाही. येथील पंचायत समिती परिसर, गोसीखुर्द कार्यालय परिसर यासाठी योग्य आहे.

नागभीड जिल्ह्याची मागणी होत असताना, ही मागणी नवीन आहे, त्यामुळे शासन या मागणीचा कसा विचार करेल असाही युक्तीवाद केला जातो. पण या युक्तीवादात मुळीच तत्थ्य नाही. गडचिरोली जिल्हा जेव्हा निर्माण करण्यात आला, त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याची मागणी कुठे पुढे आली होती ? गडचिरोलीचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन एका रात्रीतूनच गडचिरोली जिल्हा निर्माण करण्यात आला होता. नागभीड जिल्ह्याची मागणी भलेही ब्रह्मपुरी, चिमूरच्या समकालीन नसेल. पण गेल्या काही वर्षांपासून मागणी होत आहे. हे तेवढेच खरे आहे आणि भौगोलिकदृष्टया स्थानही योग्य आहे. सर्वच तालुक्यांना सोयीचेही आहे. शासनास जर खरोखरच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावयाची असेल तर आपल्या यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण करुन जिल्ह्याची निर्मिती करावी, केवळ मागणी करतात म्हणून जिल्हा निर्मिती होऊ नये.

Web Title: Yes! Nagbhid is the right place for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.